काबुल,
Rashid Khan's anger at Pakistan पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध सध्या अतिशय तणावपूर्ण अवस्थेत पोहोचले आहेत. अलीकडेच झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून ठार झाले. या हल्ल्यात पाच निष्पाप नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण अफगाण क्रीडाजगत आणि देश संतप्त झाला असून, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाला स्टार खेळाडू रशीद खानने जोरदार पाठिंबा दर्शविला असून, पाकिस्तानवर तीव्र टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भावना व्यक्त करत रशीद म्हणाला, पाकिस्तानी हवाई हल्ल्यात नागरिक आणि खेळाडूंचा मृत्यू ही मोठी शोकांतिका आहे. हे तरुण आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं स्वप्न पाहत होते, पण त्यांच्या जीवाचा क्रूर अंत झाला. नागरिकांना आणि क्रीडापटूंना लक्ष्य करणे हे पूर्णपणे अनैतिक आणि अमानवी आहे. अशा कृती मानवी हक्कांचे उल्लंघन आहेत आणि त्याकडे जगाने दुर्लक्ष करता कामा नये.

पाकिस्तानविरुद्धच्या आगामी सामन्यांमधून माघार घेण्याच्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. आपल्या देशाची प्रतिष्ठा, सन्मान आणि स्वाभिमान हेच प्रथम येतात. या कठीण काळात मी आपल्या देशबांधवांसोबत आहे. फजलहक फारुकीनेही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, या अत्याचारी हल्ल्यात निष्पाप नागरिक आणि क्रिकेटपटूंना ठार करण्यात आले. हे कृत्य घृणास्पद आणि लाजिरवाणे आहे. खेळाडू आणि नागरिकांची हत्या ही सन्मानाची नव्हे, तर सर्वात मोठी लाज आहे. अल्लाह गुन्हेगारांना त्यांच्या कर्माची शिक्षा देवो. दरम्यान, माजी कर्णधार गुलबदिन नायबनेही पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईवर संताप व्यक्त केला. त्याने म्हटले, उरगुन येथे झालेला हा भ्याड हल्ला म्हणजे आपल्या देशावर, आपल्या अभिमानावर आणि स्वातंत्र्यावर केलेला आघात आहे. पण पाकिस्तान कधीही अफगाणिस्तानचा आत्मा मोडू शकत नाही. या घटनेनंतर अफगाणिस्तानात संतापाची लाट उसळली आहे.