रात्रीही राहणार गुन्हेगारांवर नजर

    दिनांक :18-Oct-2025
Total Views |
 
वेध
 
हेमंत सालोडकर
criminals गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत दोन-तीन महिने सतत सण-उत्सवाचे वातावरण असते. लोकांमध्ये वेगळाच उत्साह असतो. प्रत्येकाच्या घरात चैतन्य पसरलेले असते. बाजारपेठाही वस्तू, खाद्यपदार्थांनी सजलेल्या असतात. कपडे, वस्तू, खाद्यपदार्थ घेण्यासाठी लोकांची घाई चाललेली असते. त्यासाठी बाजारात, रस्त्यांवर आबालवृद्ध मोठ्या संख्येने बाहेर निघतात. सण म्हटला की, महिलांमध्ये तर वेगळाच उत्साह संचारलेला असतो. तसाही प्रत्येक सण महिलांसाठी खास असतो. दिवाळीला कपडे, दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. बाजारात जाताना जवळच बक्कळ पैसे असतात. अशावेळी गुन्हेगार सक्रिय होतात आणि हात साफ करून जातात. सण-उत्सवांशिवाय इतरही काळात गुन्हेगार सक्रिय राहतातच. मग अशा गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना आपला खाक्या दाखवावा लागतो. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. त्यातही काही सराईत गुन्हेगार असतात. त्यांच्यासाठी तर विशेष उपाययोजना आखाव्या लागतात. गुन्हेगारांच्या टोळ्यांसाठी खास उपाय योजले जातात. दिवसाचे गुन्हे करणारे वेगळे, रात्रीचे वेगळे अशा गुन्हेगारांसाठी मग पोलिस कंबर कसतात आणि त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी गनिमी कावा वापरण्यात येतो.
 
 
 

criminal 
 
 
 
 
नागपुरात तर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेगारांसाठी खास ‘उपचार’ शोधले आहेत. रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे लक्षात घेता नागपुरातील परिमंडळ चारमध्ये ‘मिशन नाईट वॉच’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 217 ढाबे-हॉटेल्स मालकांवर मागील महिनाभरात कारवाई करण्यात आली. मुदतीपेक्षा जास्त वेळ बार सुरू राहणे किंवा दारूची विक्री करणे या प्रकरणांत या कारवाया झाल्या. विशेष म्हणजे ही मोहीम पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी राबविली. रात्रीच्या वेळेस होणाऱ्या घरफोडी व गैरप्रकारांवर आळा बसावा यासाठी 30 ऑगस्टपासून ‘मिशन नाईट वॉच’ ही मोहीम सुरू झाली. यासाठी परिमंडळ स्तरावर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्यात सर्व पोलिस ठाण्यांचे ठाणेदार व दोन कर्मचारी होते. प्रत्येक ठाण्यातील रात्रपाळीतील अधिकाऱ्यांना दररोज त्यात समाविट करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येत होते. याअंतर्गत रात्री अधिकारी, कर्मचारी मुदत संपल्यावरदेखील सुरू असलेले आस्थापना बंद करणे, आरोपींच्या घराची झडती घेणे, घरफोडीच्या ठिकाणी सायरनसह पेट्रोलिंग करणे असे उपक्रम करत आहेत. विशेष म्हणजे कर्तव्यावरील अधिकाऱ्यांना नियोजित ठिकाणावरून फोटोदेखील टाकावे लागतात. सूचनांप्रमाणे कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना लेखी खुलासादेखील मागविण्यात येत आहे. दररोजच्या कारवाईचा अहवाल सकाळी 10 वाजेपर्यंत तयारदेखील होतो.
या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडी व वाहनचोरीची ठिकाणे निश्चित केले. त्याआधारे क्राईम मॅपिंगवर भर देण्यात आला. विशेष म्हणजे एकटे राहणाऱ्यां ज्येष्ठ नागरिकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले असून बिट मार्शल्सद्वारा त्यांचे पंचिंग केले जाते. मोहीम राबविताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. आस्थापना तपासून कारवाई, घरफोडीच्या रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, सायरन पेट्रोलिंग व संशयितांची तपासणी आणि गुडमॉर्निंग पेट्रोलिंग असा हा क्रम आहे.criminals त्यामुळे गुन्हेगारांना आता गुन्हे करताना दहावेळा विचार करावा लागेल. नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशातून प्रवेश करताना दारू वाहतूक करणे, गोवंश तस्करीचे प्रमाणही वाढले होते. त्यावर अशा कारवायांमुळे आता बऱ्याच प्रमाणात चाप बसला आहे. ‘मिशन नाईट वॉच’ ही मोहीम सुरू झाल्यावर ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
राज्य सरकारने नक्षलवाद संपवण्याचा संकल्प केला तसेच राज्यातील आणि नागपूर शहरातील गुन्हेगारी संपवण्याचा विडा उचलला आहे. याचा परिणाम म्हणून पोलिस सक्रिय झाले आणि त्यांनी गुन्हेगारांना धाक वाटावा अशी कारवाई सुरू केली आहे. आता भविष्यात गुन्हेगारांना कोणताही गुन्हा करताना पहिले पोलिस आठवतील अशीच ही ‘मिशन नाईट वॉच’ ही मोहीम आहे. सण, उत्सवाच्या काळातच नव्हे तर नेहमीसाठी ही मोहीम सुरू राहावी, ही अपेक्षा.
 
9850753281