चिंता अधिकच वाढली! दिल्लीची हवा विषारी

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली ,
delhi air pollution राजधानी दिल्लीमध्ये थंडीने सौम्य सुरुवात केली असली, तरी हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच वायुप्रदूषणाने भीषण रूप धारण केले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील अनेक भागांत हवेची गुणवत्ता ‘खराब’ ते ‘अत्यंत खराब’ या श्रेणीत नोंदवण्यात आली असून, AQI 300 च्या पुढे गेलेल्या भागांची संख्या वाढत आहे. आज (रविवार) दिल्लीचा एकूण AQI 282 इतका नोंदला गेला, जो की ‘खराब’ श्रेणीत मोडतो.
 
 

delhi air pollution 
दिवाळीला अजून काही दिवसांचा अवधी असतानाच प्रदूषणाने राजधानीतील जनजीवन पुरते व्याकुळ केले आहे. आनंद विहार, वजीरपूर, दिलशाद गार्डन, जीटीबी नगर, गाझीपूर, जहांगीरपुरी, योजना नगर, रोहिणी आणि अशोक विहार या भागांमध्ये AQI 346 ते 360 च्या दरम्यान नोंदला गेला, जो की ‘धोकादायक’ श्रेणीत येतो. याशिवाय सिरी फोर्टमध्ये 318, आर. के. पुरममध्ये 323, द्वारका सेक्टर ८ मध्ये 335, पंजाबी बागमध्ये 313, आणि नेहरू नगरमध्ये 310 इतका AQI असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
 
 
आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना अत्यंत काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि अस्थमा वा इतर श्वसनविकारांनी ग्रस्त नागरिकांनी घरातच राहणं आणि घराबाहेर पडताना N95 मास्क वापरणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. अत्यंत सूक्ष्म धूलिकण आणि विषारी वायूंमुळे थेट फुफ्फुसांवर परिणाम होण्याचा धोका असून, या स्थितीत दीर्घकालीन आरोग्यविषयक परिणामांची शक्यता नाकारता येत नाही.
या भीषण delhi air pollution प्रदूषणामागे प्रमुख कारणं म्हणून पंजाब व हरियाणामधील पराळी जाळणं, दिल्लीत वाढलेली वाहनसंख्या, सततची वाहतूक कोंडी आणि सध्या कमी वेगाने वाहणारे वारे यांचा उल्लेख केला जात आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे दिल्लीची हवा दिवसेंदिवस अधिकच विषारी बनत आहे.ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारने २०२५-२६ साठीचा ‘विंटर अ‍ॅक्शन प्लॅन’ अंमलात आणला आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेल्या या योजनेत सात मुख्य बाबींवर भर देण्यात आला आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करणं, बांधकाम साइट्सचं योग्य व्यवस्थापन, वाहनांमधून होणाऱ्या धुरावर नियंत्रण, औद्योगिक प्रदूषणाची तपासणी, कचरा व जाळपोळ नियंत्रण, नागरिक सहभाग वाढवणं आणि ग्रीन इनोव्हेशनसाठी प्रयत्न हे या आराखड्यातील मुख्य घटक आहेत.
 
 
तथापि, सध्या लागू असलेल्या GRAP (Graded Response Action Plan) चा पहिला टप्पा फारसा प्रभावी ठरत नसल्याचं चित्र आहे. दिवाळीनंतर फटाक्यांमुळे प्रदूषणात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याआधीच हवामान धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर, तज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडून अधिक कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी देखील वैयक्तिक पातळीवर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा, या हिवाळ्यात दिल्लीकरांना श्वास घेणंही अवघड होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.