नागपूर,
Samruddhi Mahamarg traffic jam, पुण्यावरून दिवाळीसाठी नागपूरकडे परतणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी समृद्धी महामार्ग हा वेगाचे प्रतीक ठरण्याऐवजी संयमाची परीक्षा घेणारा मार्ग ठरला. छत्रपती संभाजीनगर, शिकरपूर आणि अहिल्यानगर परिसरात किलोमीटरभर वाढलेल्या वाहतूक कोंडीत वाहन रांगाच रांगा उभ्या राहिल्या. प्रगतीचे प्रतीक मानल्या गेलेल्या या महामार्गाने प्रत्यक्षात ‘चालत्या पार्किंग’चा अनुभव दिला. त्यातच अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याने संकट आणखी गंभीर झाले.
पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबलचक रांगा महामार्गापर्यंत आल्याने कोंडी अधिकच वाढली. सुरू असलेली दुरुस्तीची कामे, एक लेन बंद असणे आणि अभूतपूर्व प्रमाणात वाढलेला सणासुदीचा गर्दीचा ओघ यामुळे प्रवास तासनतास ठप्प राहिला. पुण्यात नोकरी करणाऱ्या कुर्हेकर दाम्पत्याने 'तरुण भारत' शी संवाद साधतांना सांगितले की, सुमारे तीन तासापासून आम्ही एकाच जागी अडकून होतो. दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही नागपूरला येत असताना कुटुंबियांना भेटण्याचा आनंद मनस्ताप आणि थकव्यामध्ये बदलला. सामान्यतः पुणे-नागपूर समृद्धी मार्गे १० ते १२ तासांचा प्रवास असतो. मात्र या दिवाळीत तो १८ तासांहून अधिक झाला. कडक उन्हात सरपटत पुढे सरकणाऱ्या वाहनांत प्रवाशांचे हाल झाले. वळणारी माहिती, पर्यायी मार्ग किंवा घटनास्थळी पुरेशा पोलिसांअभावी परिस्थिती अधिकच बिघडली. ‘प्रगतीचा एक्स्प्रेसवे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरच्या या अनुभवाने त्यातील व्यवस्थापनातील त्रुटी उघड केल्या. विशेषतः बांधकाम सुरू असलेल्या भागांमध्ये महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक पोलिसांचे समन्वयअभावी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.