मोहगावात सोयाबीनमध्ये सोडली जनावरं तर सेलगावात चालविला रोटावेटर!

soyabean-heavy rain सोयाबीनला लागलेल्या शेंगाच भरल्या नाही

    दिनांक :19-Oct-2025
Total Views |
समुद्रपूर / कारंजा (घा.), 
 
 
soyabean-heavy rain यंदा अतिवृष्टीसह सोयाबीनवर आलेल्या विविध रोगांमुळे शेतकरी हतबल झाला. अतिवृष्टीमुळे पिकांसह शेती खरडून निघाली. त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उर्वरित पिकंही हातून गेले. आता सोयाबीन सवंगणीचा काळ असून लावलेला खर्चही निघणार नाही, त्यामुळे सवंगणी न करता मोहगाव येथील शेतकर्‍याने ५ एकर शेतात जनावरं सोडली तर कारंजा घाडगे तालुक्यातील सेलगाव लवणे येथील शेतकर्‍याने रोटावेटर फिरविला. अतिवृष्टी व विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पीक निर्सगाने हिरावून नेले.
 
 
 

soyabean-heavy-rain 
 
 
 
soyabean-heavy rain सध्या सवंगणीला सुरूवात झाली असून पीक हाती येणारच नाही या भितीने मोहगाव येथील पुरुषोत्तम ओरके यांनी ५ एकरातील सोयबीन पिकात चक्क जनावरं सोडली आहे. शेतकरी पुरुषोत्तम ओरके यांनी ५ एकरमध्ये सोयबीनची पेरणी केली होती. सोयबीनला चांगले रासायनिक खते दिले. पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच महागड्या किटकनाशकांची फवारणी सुद्धा केली. ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत सोयाबीन पिवळे पडले. यातच संततधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने हा रोग जाईल व शेंगा भरेल, अशी आशा बाळगून असताना शेंगा अर्धवट भरल्यामुळे शेतकर्‍याने सोयाबीनची कापणी न करता उभ्या सोयाबीन पिकात जनावरे चरायला सोडली. यामध्ये जवळपास त्यांचे दीड लाखांच्या वर नुकसान झाले आहे. आता सरकारकडून मिळणार्‍या मदतीकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
soyabean-heavy rain जंगलव्याप्त कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी वन्य प्राण्यांपासून पिकांचे स्वतःच्या जिवावर उदार होऊन पीक वाचवून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यंदा कधी नव्हे ती परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढवली असून, तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीत पाणी आले आहे. उभ्या सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवत आहे. तालुयातील सेलगाव लवणे येथील अनेक शेतकर्‍यांनी उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे सोयाबीन सोंगण्याऐवजी त्यावर रोटाव्हेटर फिरवत आहे. १८ ऑटोबर रोजी सेलगाव लवणे येथील मनीष कालभूत या प्रगतशील शेतकर्‍याने दोन एकरात सोयाबीन पेरले होते. मात्र, यावर्षीच्या अति पावसाने त्यांचे सोयाबीनला लागलेल्या शेंगाच भरल्या नाही. हाती आलेले सोयाबीन बघितल्यानंतर उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी सोयाबीनवर ट्रॅक्टरने रोटावेटर फिरवला.