तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Aditya Tatwawadi येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रमेश तत्त्ववादी व नागपूरचे निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक जोशी यांचा नातू आणि सध्या लंडन निवासी असलेल्या निखिल व मंजिरी तत्त्ववादी यांचा मुलगा आदित्य तत्त्ववादी याने आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारो पर्वताचे सर्वात उंच शिखर ‘उहुरू’ सर केले आहे.
केवळ एकवीस वर्षीय अभियंता आदित्यने उहुरू शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. केवळ चिकाटी, तयारी आणि आत्मविश्वास यांच्या भरवशावर आदित्यने 19,341 फूट उंचीच्या या शिखरावर ट्रेकिंगचा कुठलाही पूर्वानुभव नसताना यशस्वी चढाई करून दाखवली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया या देशात किलीमांजारो हा जगात सर्वात उंच असलेला फ्री स्टँडिंग पर्वत आहे. त्याचे शिखर ‘उहुरू’ हे जगातील सात सर्वोच्च शिखरांपैकी एक, एवढेच नव्हे तर तो जगातील सर्वात उंच कडा मानला जातो. विषुववृत्ताजवळ असूनही या पर्वतावर सतत बर्फाचे आच्छादन असल्यामुळे हे सर करणे जगभरातील साहसी गिर्यारोहकांसाठी एक मोठे आव्हान असते. इतर सर्व मार्गांवरील यशाचे प्रमाण 40 ते 50 टक्के असते. मात्र हा मार्ग तांत्रिक कठीणतेमुळे नेहमीच यशाचा सर्वात कमी दर दर्शविणारा आहे.विशेष म्हणजे आदित्य तत्त्ववादी याने त्रिनिटी कॉलेज केंब्रिजमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून लंडन येथे इंटर्नशिप करत असताना हा स्वरचित व स्वप्रयोजित उपक्रम पूर्णत्वास नेला आहे.
लेमोशो वेस्टर्न ब्रिज हा मार्ग निसर्गरम्य असून तो हळूहळू उंचीशी जुळवून घेत चढाई करण्याचा लाभ देतो. पण तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण मार्गाने नऊ दिवसांमध्ये आदित्यने हे ध्येय साध्य केले आहे. हा मार्ग उभ्या खडकांच्या भिंती, विरळ हवा, उणे तापमान आणि ऑक्सिजनची कमतरता अशा अनेक अडथळ्यांनी भरलेला आहे. आदित्यची शेवटची चढाई कडाक्याच्या थंडीत मध्यरात्री सुरू झाली. अशा परिस्थितीत अखंड प्रयत्न व दृढनिश्चयपूर्वक हे ‘शिखर’ त्याने गाठले आहे.
या मोहिमेत Aditya Tatwawadi पाच भौगोलिक पट्ट्यांमधून प्रवास करावा लागतो. सपाट शेतीयोग्य जमीन, रेन फॉरेस्ट, हीथ मूरलँड, अल्पाईन वाळवंट आणि आर्टिक शिखर यांचे तापमान कायमच उणे राहात असून ते झपाटाने बदलतही असते. शिखरावर तर ऑक्सिजनचे प्रमाण समुद्रसपाटीच्या निम्म्याहून कमी असते.
किलीमांजारोची चढाई ही केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि तांत्रिक कौशल्याच्या कसोटीवर भर देणारी असल्यामुळे, हा मार्ग इतर मार्गांपेक्षा वेगळा ठरतो.स्वप्न उंच असली तरी प्रयत्न व नियोजन पक्के असेल तर ती गाठता येतात. जग पाहण्याचा व समजून घेण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक होतो, असे आदित्य तत्त्ववादीने हे शिखर सर केल्यानंतर लंडन येथून ‘तरुण भारत’ला सांगितले.