अग्रलेख
afgan pakistan कर्म ही एक प्रकारची परीक्षा असते. तुम्ही जसे कर्म कराल, तसे फळ मिळणे निश्चित आहे. कर्माच्या मागोमाग त्याचे फळ मिळतेच. कितीही प्रयत्न केले तरी ते टाळता येत नाही. मग कर्म वाईट असो की चांगले! यासंदर्भात संत कबीर यांचा दोहा आहे.
कबीर म्हणतात-
जो टोकू कांटा बुवे, ताहि बोय तू फूल ।
तोकू फूल के फूल है, बाकू है त्रिशूल ।।
अर्थात्, कुणी जर तुमच्या मार्गात काटे टाकत असला तरी तुम्ही फुले टाका. तुम्हाला फुलेच मिळणार आणि काटे टाकणाऱ्याला मिळणार त्रिशूळासमान काटे. जन्म झाला तेव्हापासूनच पाकिस्तानने भारताच्या मार्गात सातत्याने काटे पेरण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ भारतच नव्हे तर तेव्हाचा पूर्व पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश असो की शियाबहुल इराण, पाकिस्तान सातत्याने कुरापती करीत आला. गेल्या 78 वर्षांत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि मुस्लिम उम्माहसाठी धडपडणारा हा देश आज रसातळाला गेला आहे. गजवा-ए-हिंदसारख्या कपोलकल्पित कल्पनेच्या मागे धावून स्वत:चे हसे करून घेत आहे. भारताचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणारा हा देश आता गृहयुद्धात लोटला जाण्याची परिस्थिती आहे. आज बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि व्याप्त काश्मिरात शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. पूर्व सीमा अशांत करून ठेवल्यानंतर आता पश्चिम सीमाही अशांत झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात रक्तरंजित संघर्ष पेटला आहे. तसे पाहता अफगाणिस्तान आणि पाकिस्तान कट्टर सुन्नीपंथीय देश आहेत. दोन्ही देशांमधून गैरमुस्लिम अर्थात हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन धर्मीय परागंदा झालेत. याचे फळ दोन्ही देश भोगत आहेत.
भारताला लुटणारे परकीय आक्रमक अफगाणिस्तानातूनच आले होते. लक्षावधी भारतीयांची कत्तल करून अगणित संपत्ती त्यांनी लुटून नेली. आज, तोच अफगाणिस्तान जगापुढे भीक मागतो आहे. तेथे सर्वत्र गोंधळ असून सर्वसामान्य अफगाणी मारले जात आहेत. जसे कराल, तसे भराल, हे तत्त्व या देशाला देखील लागू झाले. जर केवळ धर्माच्या आधारावर चालल्याने कुणाचा विकास झाला असता तर आज मध्यपूर्व आणि आखाती देशांमध्ये जिकडे तिकडे श्रीमंती असती.
असो. अफगाणिस्तानात जेव्हा सर्वप्रथम 1996 मध्ये तालिबान सत्तेवर आला तेव्हा पाकिस्तानच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पण, हा आनंद फक्त चार वर्षेच टिकला. कारण, अल-कायदाने न्यू यॉर्कवर दहशतवादी हल्ला केला आणि मग अवघ्या दोनच महिन्यांत तालिबानला सत्तेवरून हाकलले गेले. 2001 ते 2024 या काळात अफगाणिस्तान निदान गृहयुद्धापासून तरी दूर होता. अमेरिका आणि नेटो फौजांनी तब्बल दहा वर्षे या देशाला आपल्या कब्जात ठेवले. या दहा वर्षांच्या काळात अफगाणिस्तानात भारत आणि पाकिस्तान विविध पातळीवर कार्यरत होते. भारताने अफगाणी नागरिकांच्या विकासाला प्राधान्य देत रस्ते, धरणे, शासकीय इमारती, एवढेच नव्हे तर संसद भवनाचीही उभारणी करून दिली. अमेरिका, रशियासह चीन आणि पाकिस्तान अफगाणिस्तानच्या भौगोलिक स्थानाचा उपयोग स्वार्थासाठी करण्यात मश्गूल असताना भारत सरकारने मानवी आधारावर मदतकार्य सुरू ठेवले. यात भारताचे आर्थिक नुकसान झाले, तालिबानने केलेल्या हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचे प्राणही गेले. हिंसेच्या आधारावर सुरू असलेल्या राजकारणाचे आयुष्य अल्प असते, याची जाणीव भारताला होती. दीर्घकाळ सुरू असलेले स्वार्थविरहित कार्य पाहून 2024 मध्ये सत्तेवर आलेल्या तालिबानने भारताप्रति नरमाई आणि सहकार्याचे धोरण ठेवले. अफगाणिस्तानला दुसरा पर्याय पण नाही. दुसऱ्या बाजूने पाकिस्तानने हक्कानी गटाच्या पाठिंब्याने तालिबानचा उपयोग दिल्लीच्या विरोधात व्हावा, यासाठी प्रयत्न केले; पण त्याला यश आले नाही. दुसऱ्यांदा सत्ता प्राप्त केल्यानंतर अफगाणिस्तानात अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा होता. गरीब जनतेची उपासमार सुरू होती. अशा बिकटप्रसंगी भारताने काबुलला गव्हाचा कधी मोफत तर कधी अत्यंत अल्पदरात पुरवठा केला. अडीच महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप आला. दोन हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आणि हजारो नागरिक जखमी झाले. या संकटाच्या काळात मदत करणारा भारत पहिला देश ठरला. चाबाहारमार्गे भारताने गहू, तांदूळ, तात्पुरते तंबू आणि औषधे अफगाणिस्तानला पाठविली. सत्तेवर कोण आहे, याचा विचार भारताने केला नाही. मानवतेच्या नात्याने आणि शेजारी म्हणून भारताने केलेल्या मदतीला पाठ दाखविणे हैबतुल्ला अखुंजादा यांच्या नेतृत्वातील तालिबानला जमले नाही. तसेही भारताची अफगाणिस्तानप्रति असलेली बांधिलकी तालिबान किंवा त्यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांशी नव्हे तर सामान्य जनतेशी होती. 2024 मध्ये काबुल तालिबान्यांच्या हाती पडताच सर्वप्रथम पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि राजकीय मुत्सद्दी काबुलमध्ये तळ ठोकून होते. काश्मीर मिळविण्यासाठी तालिबानी आता आपल्याला नक्की मदत करतील, असा समज (नॅरेटिव्ह) इस्लामाबादने जनतेत निर्माण केला.afgan pakistan पण, झाले उलटेच. गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेले विकासाचे काम आणि मानवीय मदत यामुळे तालिबानने कधीही भारताच्या विरोधात भूमिका घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने तालिबानवर दबाव आणण्यास प्रारंभ केला. गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही शेजारी देशांमधील संबंध एवढे विकोपाला गेले की रक्तपाताला सुरुवात झाली. तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी गटाने थेट पाकिस्तानात घुसून लष्करी तळे आणि प्रशिक्षण स्थळांवर हल्ले चढविले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानात मानवी वस्त्यांवर बॉम्ब टाकले. काबुलवरील या हल्ल्यांत निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या तालिबानने तेहरिक-ए-तालिबानच्या मदतीने ड्युरंड सीमारेषेवरील पाकिस्तानी चौक्यांवर तुफानी हल्ले चढविले. यामध्ये 58 पाक सैनिक ठार तर शेकडो जखमी झाल्याचा दावा करण्यात आला. झालेली हानी पाहून शरीफ सरकारने 48 तासांची युद्धबंदी करण्याची विनंती केली होती. काबुलने ती मान्यही केली. पण, मुदत संपताच पाकिस्तानने पुन्हा हल्ले करीत तीन क्रिकेटपटूंसह 40 नागरिकांचा बळी घेतला. एकीकडे दोन्ही देशांचे प्रतिनिधी शांतता करार करण्यासाठी कतार येथे जमले असताना इकडे पाकिस्तान काबुल आणि इस्लामाबादला धमक्या देत होता. कतारमधील दोहा येथे अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मुल्ला मुहम्मद याकुब आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी युद्धबंदी करारावर स्वाक्षèया केल्या. दोन्ही देश या कराराचे पालन किती दिवस करतात हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. दोन्ही देशांना दहशतवाद हा काही नवीन नाही. गेल्या पाच दशकांपासून पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करीत आला आणि तालिबान तर त्यात तरबेज आहेच. भारताशी जुळवून घेण्यातच आपला फायदा आहे याची जाणीव अफगाणिस्तानला झाली आहे.afgan pakistan दुसरीकडे पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम सीमा व्यस्त राहाव्यात म्हणून ‘गुड तालिबान-बॅड तालिबान’च्या फंदात न पडता बदलती भू-राजकीय परिस्थिती पाहता फार ताणून न धरण्याची भूमिका भारताने घेतली आहे. भारताने दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानशी कसे काय जुळवून घेतले, असा प्रश्न पाकिस्तान उपस्थित करीत असला तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. बदलत्या परिस्थितीला अनुसरून सर्वच देश आपले धोरण ठरवीत असताना भारतानेही हाच कित्ता गिरविणे सोयीचे ठरणारे आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानात जे पेरले, तेच आता उगवले आहे. रशिया, अमेरिका आणि भारताच्या विरोधात उभे करण्यासाठी पाकिस्ताननेच तालिबानला हवी तेवढी वैचारिक, आर्थिक मदत पुरविली आहे. इथे भस्मासुराचा किस्सा बरोबर लागू होतो. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला तब्बल दहा वर्षे आपल्या भूमीत लपवून ठेवणाऱ्या पाकिस्तानला त्याने केलेल्या कर्माची फळे भोगावी लागत आहेत. तर अफगाणिस्तानात केलेल्या मानवीय कार्यामुळे तालिबानला भारत जवळ वाटत आहे. हाच कर्माचा न्याय आहे. जे पेराल, तेच उगवते हा सृष्टीचा नियमच आहे.