वेध
diwali pollution free सध्या संपूर्ण देशात दिवाळीची धामधूम आहे. या धामधुमीत खरेदीला नवाच जोर चढतो. मग ते घरातील वस्तू असो, वाहन असो, सोने-चांदी, कपडे, मोबाईल सारे काही मोठ्या उत्साहात खरेदी केले जाते. याच खरेदीत फटाक्यांचाही समावेश असतो. दिवाळी आणि फटाके हे समीकरणच आपल्या देशात रूढ झाले आहे. मागील काही वर्षांत फटाक्यांच्या धुरामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन याचे प्रस्थ बरेच कमी झाले. शिवाय ज्या घरात पाच ते पंधरा वयोगटातील मुले असतात तिथे फटाक्यांचा उल्हास जास्त असतो. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना फटाके फोडण्याचा तितकासा उत्साह राहत नाही.

मुळात, फटाक्यांमध्ये आनंद शोधायचाच का? त्यातही फटाके बिना आवाजाचे असतील तर पुरे, अशी मानसिकता का तयार होत नाही, हा प्रश्नच आहे. ज्या फटाक्यांचे आवाज मोठे असतात त्याचा केवळ इतरांनाच नाही तर जे फटाके फोडतात त्यांनाही त्रास होतो. काही लोक तर वात पेटवतात आणि स्वत:च कान बंद करून दूर उभे राहतात. जर तुम्हाला स्वत:लाच आवाज सहन होत नाही तर मग इतरांचाही विचार करा आणि मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना आपल्या आनंदाच्या संकल्पनेतून हद्दपार करा. फटाके फोडूच नका, असे म्हणणे नाहीच मुळी. फटाके असे असावे ज्याचा डोळ्यांना आणि मनाला आनंद घेता येईल. ज्यामुळे प्रदूषणही कमी होईल. त्यासाठी हरित फटाके हा उत्तम पर्याय आहे. खुद्द सर्वोच्च न्यायालयानेही याला दुजोरा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांनी तर सरन्यायाधीशांना म्हटले की, अहो, आपणही लहान होतो आणि आपल्यालाही फटाक्यांचा उल्हास होताच. हा आनंद हिरावता कामा नये. त्यामुळे फटाके फोडायला हरकत नाही. पण, ते हरित फटाके असावेत आणि मोठ्या आवाजाचे नसावेत. आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर अनेक घरांमध्ये केवळ आजी-आजोबा असतात. दिवाळीच्या पाच दिवसात ते दारं-खिडक्या बंद करून बसतात. कारण त्यांना फटाक्यांचा मोठा आवाज आणि धूर दोन्हीही सहन होत नाही. कोणाच्या घरात आजारी लोक असतात, ज्यांना तर या दोन्ही गोष्टी अतिशय त्रासदायक ठरू शकतात. तान्ह्या बाळांनाही याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवच काय तर प्राणीही फटाक्यांमुळे घाबरून एका कोपèयात बसलेले असतात, हा आपला अनुभव आहे. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असतील त्यांनी हे निरीक्षण नक्की करा. निदान आपल्या घरातील या सर्व सदस्यांचा विचार करून तरी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना हद्दपार करा.
प्रत्यक्षात मोठा आवाज व्हायलाच हवा, हा अट्टहास का? दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळे हवेतील कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन्स, सल्फर डायऑक्साईड इत्यादींचे हवेतले प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढते. गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि अस्थमाचे रुग्ण यांना या काळात सर्वाधिक त्रास होतो, असे अनेक संशोधनात आढळून आले आहे. हवेतील सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर्स (एसपीएम) यांची पातळी वाढल्यामुळे घसा, नाक आणि डोळ्यांना त्रास होतो.diwali pollution free त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो आणि मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होतो. ज्या लोकांना हृदयरोग, श्वसनाचे विकार आणि मज्जासंस्थचे विकार असतात, तसेच सर्दी, खोकला आणि अॅलर्जी असणाऱ्या लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण त्याचबरोबर त्यामुळे होणारा आवाज हा आणखी एक मोठा धोका आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण नैसर्गिक स्रोत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आवाजाच्या पातळीसाठी दिवसाला 60 डेसिबल आणि रात्री 50 डेसिबल्स इतकी मर्यादा आखून दिलेली असते.
फटाक्यांमुळे ही मर्यादा 140 डेसिबल्सपर्यंत जाते. 85 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजामुळे ऐकायला त्रास होतो. आवाज वाढल्यामुळे अस्वस्थता, तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, उच्च रक्तदाब आणि अस्वस्थ झोप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. हा विषय संपूर्ण पानभर लिहिला तरी कमी पडेल इतका मोठा आहे. फक्त आपण एवढेच लक्षात ठेवायचे की काही गोष्टी वास्तवाच्या धर्तीवर विचार करून आपल्यापासून दूर करायला हव्या. या दिवाळीत प्रदूषणमुक्त सणाचा संकल्प करूया आणि दरवर्षी याचे कसोशीने पालन करून आपल्यासोबतच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करूया.
सोनाली पवन ठेंगडी
7755938822