कारंजा लाड,
Diwali Shidori Movement शेतकर्यांच्या अडचणी आणि अपुर्या सरकारी मदतीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने काळी दिवाळी शिदोरी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन दिवाळीच्या दिवशी २१ ऑटोबर २०२५ रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, कारंजा येथे होणार असून, यात तालुयातील सर्व शेतकरी, शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक आणि जनतेचा मोठा सहभाग अपेक्षीत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना तालुकाप्रमुख विलास पाटील सुरळकर करणार आहेत.

शेतकर्यांच्या घरी सण नाही, दु:ख आहे. दिवाळी उजळण्यासाठी आधी शेतकर्यांच्या जीवनात प्रकाश यायला हवा. त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफी जाहीर करून प्रती हेटर ५० हजार रुपये मदत द्यावी. तसेच सततच्या पावसामुळे, अनियमित हवामानामुळे आणि बाजारातील पडसादामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पीक नुकसानीचा पंचनामा करूनही अद्याप आर्थिक मदत पोहोचलेली नाही. परिणामी ग्रामीण भागात दिवाळीच्या आनंदाऐवजी चिंता आणि नैराश्य पसरले आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी आणि तत्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा दिलासा मिळेपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासाठी सर्व शेतकरी, शिवसैनिक, पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी तहसील कार्यालय, कारंजा येथे वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.