कारंजा लाड,
Gram Panchayat employees' protest कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी २० ऑटोबर पुन्हा एकदा ठाम पवित्रा घेतला. त्या अनुषंगाने २० ऑटोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाभरातील ग्रामपंचायत कर्मचार्यांचा सहभाग दिसून आला. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांना सादर केले. वाशीम जिल्ह्यातील सहा तालुयापैकी केवळ कारंजा तालुयालाच सतत निधी कमी मिळतो, याचे कोणतेही स्पष्ट कारण प्रशासनाकडून दिले जात नाही.

कारंज्याला नेहमीच कमी निधी का दिला जातो? यामागे कोणती अडचण आहे की हेतुपुरस्सर दुर्लक्ष? असा थेट सवाल कामगार संघटनेने या आंदोलनातून प्रशासनास केला. ग्रामपंचायत कर्मचार्यांना सध्या केवळ ५० टक्के वेतन मिळत असल्याने नाराजी उसळली. त्यामुळे काम पूर्ण, जबाबदार्या पूर्ण मग मोबदला अर्धाच का? उर्वरित ५० टक्के देणार कोण? असा प्रश्न आंदोलकांनी प्रशासनासमोर ठेवला. कर्मचार्यांनी ग्रामपंचायतींच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली अहवालांवरही संशय व्यक्त केला. वसुली केवळ ५० टक्के असल्याचा दाखला दिला जातो, परंतु ते आकडे खरे आहेत की खोटे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील कर्मचार्यांनी केली आहे.
तब्बल १० महिन्यांचे थकीत एरियर्स, जीपीएफ कपात न होणे, आणि राहणीमान भत्ता न मिळणे यामुळे कर्मचार्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे कारंजा तालुयाला न्याय्य निधी वाटप, ग्रामपंचायत कर्मचार्यांना १०० टक्के वेतन तात्काळ देणे,घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली अहवालांची चौकशी आणि थकीत एरियर्स, जीपीएफ कपात व राहणीमान भत्ता देयक त्वरित मंजूर करणे अशा मागण्या करण्यात आल्या आहे. आम्ही गावोगाव विकासाची कामं करत आहोत, पण आमचं स्वतःचं जगणं अनिश्चिततेत आहे. आमच्या मागण्या न्याय्य आहेत आणि त्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. असा निर्धार यावेळी सहभागी आंदोलकांनी व्यक्त केला.या आंदोलनात कारंजा तालुयातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.