गडचिरोली,
Mahendra Brahmanawade News गेल्या पाच वर्षांत गडचिरोली नगर परिषदेत भाजपच्या सत्तेखाली प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. ओबीसी व आदिवासी समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारने दुर्लक्ष केले असून जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आता जनता भाजपच्या कारभाराला कंटाळली असून आगामी निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत देईल, असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केला. ते काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते.

आगामी जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षातर्फे 27 ऑक्टोबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यातून निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजवला जाणार असल्याची माहिती ब्राह्मणवाडे यांनी दिली. गेल्या निवडणुकीत गडचिरोली नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. या काळात विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाले. ओबीसी व आदिवासींच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्यात भाजप सरकार अपयशी ठरले, असा आरोप जिल्हाध्यक्षांनी केला.
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ आढळून येत आहे. अनेक मृत मतदारांची नावे अद्याप याद्यांमध्ये आहेत. तसेच एकाच मतदाराची नावे दोन ते तीन ठिकाणी आढळत आहेत. याबाबत निवडणूक विभागाला अद्ययावत करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणुकीपूर्वी या त्रुटी दूर न झाल्यास काँग्रेस पक्ष जनआंदोलन छेडणार, असा इशाराही ब्राह्मणवाडे यांनी दिला. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडे सक्षम महिला उमेदवार असल्याचे सांगून त्यांनी पक्ष मजबूतपणे निवडणुकीत उतरल्याचे स्पष्ट केले. 27 तारखेच्या मेळाव्यात अनेक कार्यकर्ते व नागरिक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रपरिषदेत माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. राम मेश्राम, शहराध्यक्ष सतीश विधाते, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर आदींची उपस्थिती होती.