मुंबई
Vishal साल 2023 साठी नुकतेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये शाहरुख खानने सर्वोत्तम अभिनेता तर राणी मुखर्जीने सर्वोत्तम अभिनेत्रीचा सन्मान पटकावला आहे. मात्र दरवेळीप्रमाणे याही वेळी या पुरस्कारांच्या निकषांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यावेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विशाल यांनी या पुरस्कार वितरण प्रक्रियेवर जोरदार टीका केली असून, संपूर्ण सिस्टमलाच त्यांनी “बकवास” असे म्हटले आहे.
एका अलीकडील मुलाखतीत विशाल यांनी राष्ट्रीय पुरस्कारांसंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “माझा अशा कोणत्याही पुरस्कारांवर विश्वास नाही. हे सगळं प्रकार म्हणजे केवळ एक पद्धतशीर वेडेपणा वाटतो. कसे काय फक्त चार लोक एका खोलीत बसून देशभरातल्या कोट्यवधी प्रेक्षकांसाठी बनलेल्या चित्रपटांमधून सर्वोत्तम अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक भूमिकांचा निर्णय घेऊ शकतात? हे चार लोक कोण आहेत जे संपूर्ण इंडस्ट्रीसाठी निर्णय घेतात?”
विशाल Vishal यांचे म्हणणे आहे की, अशा पुरस्कारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून, प्रेक्षकांच्या मतांचा विचार केला जात नाही. “तुम्हाला सर्वेक्षण करायला हवे. लोकांची मते विचारात घेतली पाहिजेत. फक्त काही जणांनी दिलेला निर्णय ही काही खरी ओळख नसते. अशी कोणतीही पारितोषिकं मला नकोत. जर मला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला, तर मी तो कचरापेटीत फेकून देईन. आणि जर तो सोन्याचा असेल तर विकून त्याचे पैसे दान करीन,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
विशाल यांनी हेही स्पष्ट केलं की त्यांचे विचार कुठल्याही वैयक्तिक अनुभवावर आधारित नाहीत, तर त्यांना संपूर्ण पारितोषिक व्यवस्थेचाच विरोध आहे. त्यांच्या मते, खरा सन्मान प्रेक्षक देतात, ज्यूरी नव्हे. “माझ्या मते, जे खरोखरच पात्र आहेत त्यांनाच पुरस्कार मिळायला हवेत. मी आयोजकांना आधीच सांगितले आहे की मला कोणीही पुरस्कार देऊ नये,” असे ते म्हणाले.विशाल सध्या ‘मगुडम’ या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अचूक तारीख जरी जाहीर झालेली नसली, तरी 2026 पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चित्रपटसृष्टीत आणि पुरस्कार व्यवस्थेत खळबळ उडाल्याचे चित्र आहे.विशाल यांच्या मतांवर इंडस्ट्रीतील इतर कलाकार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे — राष्ट्रीय पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांवरही आता सर्वसामान्य प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकार प्रश्न विचारू लागले आहेत.