वाशीम,
Patni Chowk-Ambedkar Chowk दिवाळी पर्वाच्या सर्वत्र खरेदीची धुम असून, पादचार्यासह वाहनधारकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, वाहतूक पोलिस प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे पाटणी चौक ते आंबेडकर चौक या मार्गावरील वाहतूकीची वारंवार कोंडी होत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाटणी चौक ही मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी खरेदीसाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, दिवाळी सणानिमीत्त कापड खरेदी, दिवाळी साहीत्य महालक्ष्मी मुर्ती, पणत्या, बोळके, झाडू, झेंडुची फुले, फळे इतर साहीत्य खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरीकांची एकच झुंबड उडत आहे.

याशिवाय आंबेडकर चौक ते जुनी नगर परिषद रोड मार्गावर फटाके दुकाने असल्याने याठिकाणी देखील ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यात पाटणी चौक हा नेहमीच वर्दळीचा आहे. या चौकाला चारही बाजुनी रस्ते असल्याने वाहनांची गर्दी होत आहे. वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाटणी चौक या मुख्य चौकात पोलिस प्रशासनाच्या वतीने कोणतेही नियोजन नाही. एक नाही तर दोन वाहतूक पोलिस याठिकाणी तैनात असतात. त्यातही हे पोलिस आपले कर्तव्य न बजावता इतरत्र फीरतांना दिसतात. वाहतूकीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने याठिकाणी वारंवार वाहतुक प्रभावित होत आहे. याचा त्रास पादचार्यासह वाहनधारकांना देखील होत आहे. याकडे वरिष्ठ पोलिस प्रशासनाने लक्ष देवून पाटणी चौक ते आंबेडकर चौक या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.