वर्धा,
Prof. Dr. Sharad Mohod honored दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचा राष्ट्रीय पुरस्कार डॉ. शरद मोहोड यांना केरळ स्टेट सेंटरच्या त्रिवेंद्रम येथील इलेट्रिकल नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये केरळचे ऊर्जामंत्री कृष्णकुट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आय. ई. आय. ही जगातील सर्वात मोठ्या बहुविद्या शाखीय व्यावसायिक अभियंता संघटनांपैकी एक आहे. या संस्थेला शंभरपेक्षा अधिक वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. केरळ स्टेट सेंटर द्वारे वीज निर्मिती, प्रसारण, वितरण आणि वापरातील आधुनिक ट्रेन्डवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभाव या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून देशातील चार नामवंत अभियंत्यांना इमिनन्ट इंजिनियर्स या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. शरद मोहोड यांनी यापूर्वी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर अमरावती लोकल सेंटरचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या नावे अनेक पेटेंट व कॉपीराईट प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना इमिनन्ट इंजिनियर्स या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.