तभा वृत्तसेवा
आर्णी,
dr balkrishna sarkate वृद्ध, अंध, अपंग, निराधार, मनोरुग्ण व निराश्रित लोकांची नि:स्पृह, मनाने सेवा करणे हे मानवी जीवनातील सर्वोच्च कर्म आहे. मग ती सेवा कोणत्याही प्रकारची असो, ती निरागस, नि:स्वार्थ असावी. तिला जराही स्वार्थाचा वा लाभाचा दुर्गंध नसावा. ‘ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती’ असा सेवाभाव असावा. आपण अशा वृद्धांमध्ये माय बापाचे रूप पहावे. अशी मानव सेवा हीच परमेश्वर सेवा होय. देवाची खरी पूजा होय. संत तुकारामांनी रंजल्या गांजल्यांची सेवा करणाèयाला देव म्हटले आहे.
सेवा परमो धर्म: याचाही हाच अर्थ आहे. हे असे निष्काम सेवाव्रत ज्याला साधले तो महापुरुष होतो. तो मानव सेवेत देवाचे रूप पाहतो. अशी नि:स्वार्थ सेवा हे परमश्रेष्ठ जीवनमूल्य होय असे प्रतिपादन यवतमाळचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त, समाजसेवक, वक्ते प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मातोश्री सुशीलाबाई नागपूरे वृद्धाश्रम आर्णी येथे यवतमाळ येथील समाजभान मिशनने घेतलेल्या सेवा उपक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विचार मंचावर वृद्धाशमाचे व्यवस्थापक मारोतराव नागपुरे, डॉ. बाळकृष्ण सरकटे, विनायक गंगशेट्टीवार, प्रा. अमित बागडे यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी निर्मोही संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हारार्पण व प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृद्धाशमाचे व्यवस्थापक मारोतराव नागपुरे होते. आर्णी येथील लोकप्रिय शिक्षक विनायक गंगशेट्टीवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.dr balkrishna sarkate भारती महाविद्यालयाचे प्रा. अमित बागडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. 50 ब्लँकेट व खाऊ वाटपाच्या या मुख्य कार्यक्रमानंतर वृद्ध नागरिकांच्या दुःखावर फुंकर म्हणून विनय मिरासे यांनी याप्रसंगी त्यांच्या विनोदी शैलीतून विविध कौटुंबिक, सामाजिक आशयाची गीते सादर केली. प्रमुख अतिथी गंगशेट्टीवार म्हणाले, आई-वडील हेच खरे परमेश्वर असतात. त्यामुळे माय-बापाची व इतर वृद्ध व्यक्तींची सेवा ही परमेश्वराची पूजा व खरी भक्ती आहे. प्रा. अमित बागडे यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन समाजभान मिशनचे सचिव विनय मिरासे यांनी केले. मातोश्री सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रमाचे संस्थापक व संचालक खुशाल नागपुरे यांनी आभारप्रदर्शन व समारोपीय कार्यक्रमात वृद्धांच्या व्यथा त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. कार्यक्रमाला वृद्धांची व परिसरातील बहुसंख्य लोकांची उपस्थिती होती.