Shri Lakshmi Puja ceremony २०२५ मध्ये दिवाळीचा पवित्र सण २० ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे याहीवेळी घराघरांत श्री लक्ष्मी पूजनाचा सोहळा संपन्न होईल. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी ५:४६ वाजता सुरू होणारा हा कालावधी मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. या काळात केलेली लक्ष्मीपूजा अत्यंत फलदायी मानली जाते. धर्मग्रंथांनुसार, लक्ष्मी पूजेच्या वेळी काही विशेष संकेत मिळाले तर ते अत्यंत शुभ मानले जातात. हे संकेत देवीच्या कृपेचे आणि पूजेच्या यशस्वितेचे चिन्ह मानले जाते.
जर दिवाळीच्या पूजेदरम्यान दिव्याची ज्योत पूर्णपणे स्थिर राहिली आणि तिचे तेज अधिक पिवळसर किंवा नारिंगी दिसले, तर तो संकेत अत्यंत शुभ असतो. शांत आणि न हलणारी ज्योत ही देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असल्याचे प्रतीक मानली जाते. अशी ज्योत घरात शांती, स्थैर्य आणि समृद्धी आणते.
पूजेदरम्यान जर देवघरातील चित्रावरून किंवा मूर्तीवरून अचानक एखादे फूल खाली पडले, तर ते लक्ष्मीदेवीच्या आशीर्वादाचे संकेत असतात. असे घडल्यास, देव तुमच्या भक्तीवर प्रसन्न झाला आहे आणि तुमची पूजा स्वीकारली गेली आहे, असे मानले जाते. हे चिन्ह आगामी काळात आनंद आणि सुख येण्याचे सूचक असते.
कधी कधी पूजेदरम्यान भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. हेही अत्यंत शुभ मानले जाते. अश्रू हे भावनिक शुद्धतेचे प्रतीक असून, ते भक्त आणि देव यांच्यातील आत्मिक नाते दृढ झाल्याचे द्योतक मानले जाते. असे घडल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि सौभाग्य वाढते, असा विश्वास आहे.
तसेच, पूजेच्या वेळी जर तुम्हाला बासरीचा सूर, घंटानाद किंवा कोणतेही वाद्य वाजवताना ऐकू आले, तर तेही शुभ संकेत मानले जाते. हे लक्ष्मीदेवीच्या आगमनाचे आणि घरात आनंद, शांतता व संपन्नता येण्याचे लक्षण समजले जाते. दिवाळीच्या या पवित्र क्षणी मिळणारे हे सूक्ष्म संकेत तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन आणि सुख-समृद्धीचे वास दर्शवतात.