राजदने आखली मोठी रणनीती...३६ विद्यमान आमदारांचा पत्ता कट

    दिनांक :21-Oct-2025
Total Views |
पाटणा,
RJD has planned a big strategy बिहार विधानसभा निवडणुकीच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाने (राजद) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली १४३ उमेदवारांची यादी जाहीर करताना पक्षाने मोठा फेरबदल केला असून, गत निवडणुकीतील ३६ विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात खळबळ उडाली असून बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
RJD has planned a big strategy
 
विशेष लक्ष वेधणारी बाब म्हणजे माजी मंत्री तेजप्रताप यादवांच्या मतदारसंघातही नवीन उमेदवार माला पुष्पम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, रघुनाथपूर येथील आमदार हरीशंकर यादव यांचं तिकीट कापून बाहुबली नेते शहाबुद्दीनच्या पुत्र ओसामाला संधी देण्यात आली आहे. धोरय्या आणि दिनारा येथील विद्यमान आमदारांचेही तिकीट कापण्यात आले असून, राजदचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेश यादव या जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
 
काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून अलोक मेहता, चंद्रशेखर, युसूफ सलाउद्दीन आणि चंद्रहास चौपाल यांचा समावेश आहे. जहानाबाद येथील आमदार सुदय यादव यांचे मतदारसंघ बदलले असून त्यांना कुर्था येथून उमेदवारी मिळाली आहे. महागठबंधनातील काँग्रेस, राजद, व्हीआयप आणि सीपीआय यांच्यातील काही जागांवर उमेदवारांची टक्कर होती, पण राजदच्या १४३ उमेदवारांच्या यादीनंतर हा पेच सुटल्याचे दिसते. काँग्रेसने आता आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणे बाकी आहे.
 
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा ६ नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा ११ नोव्हेंबरला होईल. मतमोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे. एनडीएतर्फे भाजप-जदयूला १०१-१०१ जागा, लोजपा रामविलास २९, जीतनमराम मांझींच्या पक्षाला ६ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलकेजे पक्षाला ६ जागा मिळाल्या आहेत.