चंद्रपूर,
Chandrapur arms seizure ऐन दिवाळीला चंद्रपुरात मोठा संभाव्य घातपात होण्यापूर्वी पोलिसांनी कारवाई करीत, 2 माऊझर गन (पिस्टल), 2 देशी कट्टे, 35 जिवंत काडतुसे व चार खंजर असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. या कारवाईत आरोपी चन्द्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरिस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा उर्फ टँक्यु, अमित बाडूकराम सोनकर (सर्व रा. बल्लारपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
शहरात देशी कट्टा घेऊन काही व्यक्ती येणार असल्याची माहिती लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गंजवार्ड परिसरातील दादामिया ट्रान्सपोर्टसमोर सापळा रचला. यावेळी 2 चारचाकी व एक दुचाकी वाहनात तब्बल 8 जण त्याठिकाणी आले असता, पोलिसांनी 4 जणांना पकडले. त्यापैकी 4 जण पसार झाले. पोलिसांनी चारचाकी वाहनांची झडती घेतली असता त्यात 2 देशी कट्टे, दोन माऊझर गन, 35 जिवंत काडतुसे, 4 खंजरसह तब्बल 17 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिसांनी आरोपींविरूध्द भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनवण, पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, हवालदार लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इमरान शेख आदींनी केली.