नवी दिल्ली,
Delhi's most toxic during Diwali प्रकाशाचा सण दिवाळी दिल्लीकरांसाठी यंदा विषारी सण ठरला. राजधानी दिल्लीची हवेची गुणवत्ता या वर्षी दिवाळीच्या काळात गेल्या चार वर्षांतील सर्वात वाईट नोंदवली गेली आहे. दिवाळीच्या रात्री हवेतील सूक्ष्म कणांचे (PM 2.5) प्रमाण प्रति घनमीटर तब्बल ६७५ मायक्रोग्रामपर्यंत पोहोचले, जे २०२१ नंतरचे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा प्रदूषणाच्या जाळ्यात सापडली असून, नागरिकांसाठी श्वास घेणेही कठीण झाले आहे.
दिवाळीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी दिल्लीवर धुराचे दाट थर पसरले होते. हवेत इतके प्रदूषण होते की अनेक भागांमध्ये दृश्यमानता कमी झाली होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिवाळीच्या दिवशी दिल्लीचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक ३४५ इतका नोंदवला गेला, जो “अत्यंत वाईट” या श्रेणीत मोडतो. मागील वर्षी ही आकडेवारी ३३०, २०२३ मध्ये २१८ आणि २०२२ मध्ये ३१२ इतकी होती.
सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती, मात्र या आदेशाचे सर्रास उल्लंघन झाले. रात्री उशिरापर्यंत आणि पहाटेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच राहिली. त्यामुळे प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली. एक्यूआय रात्री १० वाजता ३४४, ११ वाजता ३४७, मध्यरात्री ३४९ आणि पहाटे १ वाजता ३४८ इतका होता. दुसऱ्या दिवशी सकाळीही हवेची स्थिती सुधारली नाही; सकाळी ८ वाजता निर्देशांक ३५९ वर पोहोचला होता.