सेलू,
selu accident मोबाईलवर बोलत असताना अंधारात विहीर न दिसल्याने आकाश पोहाणे (३२) रा. दुबे ले-आऊट सेलू तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना वर्धा-नागपूर महामार्गावरील यादगार साऊथ इंडियन अॅण्ड चायनीज हॉटेलमागील विहिरीत मंगळवार २१ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

मंगळवारी रात्री आकाश पोहाणे हा यादगार हॉटेलमध्ये गेला होता. दरम्यान त्यांना फोन आला. हॉटेल बंद असल्याने तो फोनवर बोलत-बोलत हॉटेलच्या मागील बाजूस गेला. मात्र, अंधारामुळे मागील बाजूस असलेली उघडी विहीर त्याला दिसली नाही आणि याच विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. रात्रीपासून आकाश घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. दुपारी त्याची दुचाकी हॉटेलबाहेर उभी दिसली. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आकाश मोबाईलवर बोलत हॉटेलच्या मागे जाताना दिसला. यानंतर विहिरीत पाहणी केली असता तेथे मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज गभणे, एएसआय राकेश देवगडे यांनी सहकार्यांसह घटनास्थळ गाठले. मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. या घटनेची सेलू पोलिसांनी नोंद घेतली आहे.