वर्धा,
Jitendra Awhad ‘ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ म्हणजे आजच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेचे राज्य सक्षम होवो, असा अर्थ होतो. बळीराजाचे राज्य म्हणजे समतेचे, श्रमाला सन्मान देणारे, न्याय्य समाजाचे राज्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेले संविधान हेच बळीराजाचे शास्त्र आहे. बळीराजाचे राज्य म्हणजेच संविधानाचे राज्य. ते सक्षम होण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
किसान अधिकार अभियानच्या वतीने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी महात्मा लॉन येथे आयोजित बळी महोत्सवात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे होते. खासदार अमर काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवते विकास लवांडे, किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार, नाट्यदिग्दर्शक व सामाजिक कार्यकर्ते हरिष इथापे, जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण भोयर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, राकाँचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, माकपचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, आदींची उपस्थिती होती.
यावेळी काकडे म्हणाले, बळी महोत्सव हा दिवाळीच्या दिवशी श्रमिकांच्या प्रश्नांवर चिंतन आणि लढ्याचे नियोजन करण्यासाठी दरवर्षी आयोजित केला जातो.प्रास्ताविक सुदाम पवार यांनी केले. संचालन सचिव प्रफुल्ल कुकडे यांनी केले. गोपाल दुधाने यांनी आभार मानले. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्या मान्यवरांचा बळी महोत्सव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला सीपीआयच्या जिल्हा सचिव द्वारका इमडवार, रिपाइंचे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर, नियाज अली, नरेंद्र मसराम, किरण ठाकरे, सुधीर पांगूळ, सुषमा शर्मा, डॉ. विनय मून, राजीव वानखेडे, शाहीर धम्मानंद खडसे, गुणवंत डकरे, जनार्दन देवतळे आदींची उपस्थिती होती.