‘मी भाजपाचा भक्त आहे'

    दिनांक :22-Oct-2025
Total Views |
मुंबई,

mahesh kothare ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी बोरिवलीत झालेल्या एका दिवाळी पहाट कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. कोठारे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जाहीर कौतुक करताना “मी भाजपाचा भक्त आहे आणि मोदीजींचा भक्त आहे,” असं म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीकेची झोड उठली आहे.
 
 

mahesh kothare 
या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एका अपघात प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी कोठारेंवर अप्रत्यक्षपणे आरोप करताना म्हटलं, “ते कलाकार आहेत हे खरं आहे, पण एका अपघात प्रकरणात त्यांची सून अडकली होती. तिला कसं वाचवायचं, तर अशी मुक्ताफळं, सुमनं उधळल्याशिवाय काही होत नाही.”
पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या, “जी काही संस्कृती तयार होतेय, मी नाव घेणार नाही कारण कुठल्याही जातीचा अपमान करायचा नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रात शौर्य आणि क्रौर्याची एक परंपरा आहे. वेळ आली की हेच कलाकार बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आठवण काढतात. त्यामुळे कोठारे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.”
 
 
याआधी खासदार संजय राऊत यांनीही कोठारेंवर उपरोधिक टीका केली होती. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना, याची मला शंका वाटते. तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही असं काही बोलला असाल तर तुम्हाला ‘तात्या विंचू’ चावेल,” असं राऊत म्हणाले होते. त्यांच्या या विधानानेही एकच खळबळ उडाली होती.महेश कोठारे यांच्या कौटुंबिक घडामोडींचा संदर्भ देत विरोधकांनी केलेल्या टीकेने राजकीय वातावरण तापलं आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कार अपघाताची पार्श्वभूमीही या वादात नव्याने चर्चेत आली आहे. 28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री उर्मिलाच्या गाडीने मेट्रोच्या कामात व्यस्त असलेल्या दोन कामगारांना धडक दिली होती. या अपघातात सम्राटदास जितेंद्रदास या कामगाराचा मृत्यू झाला होता, तर उर्मिला, तिचा ड्रायव्हर गजानन पाल आणि दुसरा कामगार जखमी झाले होते.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदी यांचं जाहीर कौतुक केल्याने त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. राजकीय पक्षांनी केलेल्या या प्रतिक्रियांवर कोठारे यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्या विधानामुळे मराठी सिनेविश्वात आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा नवा विषय तयार झाला आहे.