Self-defense in the Panchaka ऑक्टोबर महिन्यात पाच दिवसांचा पंचक काळ पुन्हा एकदा येत आहे. पंचक काळ हा ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानला जातो, कारण या काळात ग्रह आणि तारे विशिष्ट स्थितीत असतात. या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन काम सुरु करणे टाळावे, अन्यथा नकारात्मक परिणाम होऊ शकतात. विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्यात दोन पंचक काळ येत आहेत. महिन्याची सुरुवात आणि शेवट. यामुळे हा काळ अधिक संवेदनशील ठरतो, कारण महिन्याच्या सुरुवातीला ३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर आणि महिन्याच्या शेवटी ३१ ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत पंचक चालू राहणार आहे. दोन्ही वेळा पंचक शुक्रवारपासून सुरू होत असल्यामुळे त्यांना ‘चोर पंचक’ म्हणून ओळखले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक दरम्यान चंद्र धनिष्ठा, शतभिषा, पूर्वभाद्रपद, उत्तरभाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांमधून भ्रमण करतो. या काळात केवळ शुभ कार्य टाळावे असे नाही, तर इतर काही गोष्टींवरही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
चोर पंचक, मृत्यु पंचक आणि अग्नि पंचक हे विशेषतः अशुभ मानले जातात. या काळात प्रवास करणे, विशेषतः दक्षिण दिशेला जाणे, टाळावे. घराच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, सामानाचे रक्षण करावे.
लाकडी वस्तू, बेड, गादी किंवा त्यासंबंधित वस्तू खरेदी करणे टाळावे. घराच्या छप्पराची किंवा पाया घालण्यासही या काळात मनाई आहे. जर घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, तर पंचक शांतीसंबंधी उपाय करून वातावरण शांतीपूर्ण ठेवणे आवश्यक आहे.
दिवाळी आणि छठ सारख्या प्रमुख सणांच्या सुरुवातीस आलेला पंचक काळ नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची आणि घर व स्वतःच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची सूचना करतो. या काळात योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात.
टीप- वरील बातमी केवळ वाचकांची आवड लक्षात घेऊन देण्यात येत आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी.