वॉशिंग्टन,
Trump celebrated Diwali अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. भारतीय-अमेरिकन समुदायातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या प्रसंगी ट्रम्प यांनी भारतीय जनतेला तसेच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ट्रम्प यांनी दिवाळीचे वर्णन “अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय” असे करत आध्यात्मिक संदेशावर प्रकाश टाकला. त्यांनी या प्रसंगी सांगितले की, आज मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. आमच्यात अत्यंत चांगली चर्चा झाली. आम्ही व्यापारासह अनेक मुद्द्यांवर बोललो. मोदी हे एक महान व्यक्ती आहेत आणि गेल्या काही वर्षांत माझे खूप चांगले मित्र बनले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून ट्रम्प यांच्या शुभेच्छांना प्रतिसाद देत म्हटले, “राष्ट्रपती ट्रम्प, दिवाळीच्या शुभेच्छा आणि फोन कॉलबद्दल धन्यवाद. या प्रकाशोत्सवाने भारत आणि अमेरिका या दोन महान लोकशाही राष्ट्रांना जगासाठी आशेचा किरण बनवो. आपण सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध खांद्याला खांदा लावून उभे राहू. दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या या दिवाळी सोहळ्यात भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव साजरा करण्यात आला. ट्रम्प यांच्या भाषणाने भारतीय-अमेरिकन समुदायात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.