तभा वृत्तसेवा
आर्णी,
agricultural center closed : राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून साथी पोर्टल-2 च्या वापराची सक्ती राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केली आहे. परंतु या पोर्टलला विरोध दर्शवून विक्रेत्यांच्या भावनांकडे कृषी विभागाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी आज मंगळवार, 28 ऑक्टोबर रोजी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. अशी माहिती महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड्स सीड्स डिलर्स असोसिएशन, पुणेचे (माफदा) अध्यक्ष विनोद तराळ आणि महासचिव विपीन कासलीवाल यांनी दिली.

राज्याच्या कृषी विभागामार्फत बियाणे खरेदी व विक्रीसाठी साथी पोर्टल 2 ही व्यवस्था हंगाम 2015 पासून अमलात आणली. या पोर्टलबाबत विक्रेत्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींचा विचार करून कृषी विभागाने या संदर्भात अंमलबजावणी स्थगित करण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, अद्यापही साथी पोर्टल 2 चा वापर सक्तीने सुरू आहे. यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी आर्णी येथील कृषी केंद्र संघटनेतर्फे ‘साथी पोर्टल 2 बंद करावा’, या मागणीसाठी आपली प्रतिष्ठानचे बंद ठेऊन विरोध दर्शविला.
कृषी केंद्र संचालकांकडून केलेल्या तक्रारीवरुन साथी पोर्टल-2 च्या अंमलबजावणी संदर्भात कोणतीही सकारात्मक कार्यवाही झाली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांनी मंगळवार, 28 ऑक्टोबरला एक दिवस खरेदी व विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला आर्णीतील संघटनेने समर्थन दर्शविले. साथी पोर्टल 2 च्या वापरासंदर्भात राज्यातील सर्व विक्रेत्यांनी विरोध नोंदविण्यासाठी एकमुखी ठराव घेण्यात आला. यास सर्व जिल्हा संघटनांनी मान्यता दिली आहे.
सर्व विक्रेत्यांनी विक्री केंद्रांवर साथी पोर्टल 2 अंमलबजावणीविरुद्ध विक्रेत्यांचा निषेध, असे फलक लावून शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारच्या राज्यव्यापी बंदबाबत राज्याच्या संचालकांना (कृषी निविष्ठा व गुणनियंत्रण) माहिती देण्यात आली आहे.
सर्व जिल्हा अध्यक्षांनी व तालुका पदाधिकाèयांनी संबंधित जिल्ह्यांतून विक्रेत्यांना योग्य मार्गदर्शन देऊन संघटनेच्या सूचनांनुसार कार्यवाही करावी, या आंदोलनात शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवावा व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले होते त्यानुसार या मागणीसाठी सोमवारी निवेदन दिले. मंगळवार, 28 ऑक्टोबरला आर्णीतील सर्व कृषी केंद्र बंद ठेऊन याला विरोध दर्शविला, अशी माहिती कृषी केंद्र संघटना आर्णीचे अध्यक्ष गजानन कोषटवार व अन्य पदाधिकाèयांनी दिली.