शिक्षणाद्वारे आत्मनिर्भरतेचा प्रकाश निर्माण करावा: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

अनाथ व असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी विशेष उपक्रम

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
बुलडाणा, 
Kiran Patil : अनाथ बालकांच्या आयुष्यात शिक्षणाद्वारे आत्मनिर्भरतेचा प्रकाश निर्माण करणे हीच खरी सेवा आहे, असे प्रतिपादन करत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व विभागांना समन्वयातून कार्य करून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
 
 
 
buldana
 
 
 
कोविड काळात अनाथ ठरलेल्या तसेच १८ वर्षांखालील दिव्यांग आणि भावनिकदृष्ट्या असुरक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी बुलढाणा जिल्ह्यात एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश अशा बालकांचे शिक्षण, आरोग्य, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसन करून त्यांना आत्मनिर्भर आणि सुरक्षित बनविणे हा आहे.
 
 
बैठकीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा डिंगळे, बालसंरक्षण अधिकारी, तसेच पोलिस, शिक्षण, आरोग्य आणि महिला व बालविकास विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील अशा बालकांची सध्यस्थिती तपासून त्यांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी संबंधित सर्व विभागांना समन्वयातून कार्य करण्याचे निर्देश देत कोणतेही बालक शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ राबविण्याचे आदेश दिले. तसेच अशा उपक्रमामुळे जिल्ह्यातील दिव्यांग, अनाथ व असुरक्षित बालकांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून नव्या आशेचा व आत्मनिर्भरतेचा प्रकाश निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.