गाडी चालवा आणि चार्जही करा...फ्रान्सने उभारला ‘स्मार्ट महामार्ग’

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
पॅरिस,
Drive and charge too जगभरात नव्या तंत्रज्ञानाची क्रांती सुरू आहे आणि आता वाहतुकीतही एक नवा अध्याय लिहिला जात आहे. फ्रान्सने जगातील पहिला असा महामार्ग तयार केला आहे, जिथे गाडी चालवताना ती आपोआप चार्ज होईल. पॅरिसच्या नैऋत्येस सुमारे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ए10 महामार्गावर हा अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या महामार्गावर ‘चार्ज अ‍ॅज यू ड्राइव्ह’ नावाचा अभिनव प्रकल्प राबवण्यात आला असून, यात डायनॅमिक वायरलेस चार्जिंग सिस्टम बसवण्यात आली आहे.
 

Drive and charge too 
 
या महामार्गाच्या १.५ किलोमीटर लांब पट्ट्यात रस्त्याखाली इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल्स बसवण्यात आल्या आहेत. जेव्हा एखादे इलेक्ट्रिक वाहन या मार्गावरून जाते, तेव्हा रस्त्याखालील कॉइलमधून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राद्वारे वाहनातील रिसीव्हरला वीज मिळते. त्यामुळे गाडी चालवतानाच तिची बॅटरी चार्ज होत राहते. चाचणीदरम्यान हे तंत्रज्ञान अत्यंत यशस्वी ठरले असून, यात ३०० किलोवॅटपेक्षा जास्त शक्ती आणि २०० किलोवॅटची सरासरी ऊर्जा हस्तांतरण क्षमता दिसून आली आहे. हे चार्जिंग पूर्णपणे रिअल टाइममध्ये सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाते.
 
 
या क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग स्टेशनवर थांबण्याची गरज उरणार नाही. कार आणि ट्रक महामार्गावर चालू असतानाच ऊर्जेने परिपूर्ण राहतील. फ्रान्सच्या या उपक्रमामुळे भविष्यातील वाहतुकीत नवा बदल घडून येईल. ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षम होईल, प्रदूषण कमी होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढेल. फ्रान्सचा ‘स्मार्ट महामार्ग’ आता जगासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.