वरूड,
gates-of-dam-are-still-open तालुक्यातील आमनेर नजिक असलेल्या वर्धा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार्याचे एकही गेट अद्यापही बंद करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकर्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. बंधार्याचे गेट बंद करण्यात न आल्याने नदीपात्रातील पाण्याचा साठा होत नसल्याने शेतकर्यांचा ओलिताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नदीपात्रातील पाण्याचा निचरा सतत होत असल्यामुळे बंधार्यात पाणी साठून राहात नाही. त्यामुळे या भागातील अनेक शेतकर्यांच्या रब्बी हंगामातील उभ्या पिकांना याचा फटका बसत आहे. पाण्याअभावी उभे पिके हातून जाण्याच्या वाटेवर आहे. या भागातील पिके पाण्यावर अवलंबून असताना सुद्धा गेट बंद करून पाण्याची साठवणूक करण्यात आली नाही. ज्या नदीचे पाणी शेतकर्यांसाठी नवसंजीवनी म्हणून वरदान ठरत होते, त्यापासून आता वंचित राहावे लागत असल्याची स्थानिक शेतकर्यांची ओरड आहे.
त्या पाण्यावर त्या भागातील शेतकरी दरवर्षी रब्बी पीक ओलीत करून घेत होते. परंतु यावर्षी बंधार्याची अवस्था बिकट दिसत असून तेथील गेट सुद्धा चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या बंधार्याची देखभाल दुरुस्ती करणार्या संबंधित ठेकेदाराला याबाबत विचारणा करण्यासाठी स्थानिक शेतकर्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते फोन उचलून यावर समाधानकारक उत्तर देण्यासाठी पुढे सरसावत नसल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते आहे. तसेच संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्यांची व्यथा मांडायची तरी कुणाकडे असा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसत आहे. या बंधार्याचे गेट तातडीने बंद न केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा त्या भागातील शेतकर्यांनी दिला आहे.