नवी दिल्ली,
Hinduism to be the largest religion भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, येत्या काही दशकांत ती चीनलाही मागे टाकेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आता प्रतिष्ठित प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केलेल्या एका नव्या अहवालात २०५० पर्यंत भारतातील धर्माधारित लोकसंख्येचे चित्र मांडले आहे, आणि त्यातील आकडेवारी धक्कादायक ठरत आहे. अहवालानुसार, २०५० पर्यंत भारतातील हिंदूंची लोकसंख्या सुमारे १.४ अब्ज (१४० कोटी) इतकी असेल, जी जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १५ टक्के इतकी ठरेल. यामुळे हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक म्हणून ओळखला जाईल.

दुसरीकडे, इस्लाम हा सर्वाधिक वेगाने वाढणारा धर्म ठरणार असून, २०५० पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या सुमारे ३१ कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की या काळात भारत इंडोनेशियाला मागे टाकून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल. प्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, २०५० पर्यंत भारताची एकूण लोकसंख्या १.६६ अब्ज (१६६ कोटी) पेक्षा अधिक होईल. त्यापैकी अंदाजे ७८ टक्के हिंदू आणि १८ टक्के मुस्लिम असतील. उर्वरित टक्केवारीत ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि इतर धर्मीयांचा समावेश असेल. सध्या, म्हणजेच २०२५ मध्ये भारताची लोकसंख्या १.४ अब्जाहून अधिक आहे. यापैकी सुमारे १.१४ अब्ज हिंदू आणि २५ ते २६ कोटी मुस्लिम आहेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तथापि, ही आकडेवारी ही केवळ अंदाजांवर आधारित असून भारतातील शेवटची अधिकृत जनगणना २०११ मध्ये झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवीन जनगणना झाल्यानंतरच खरे आकडे स्पष्ट होणार आहेत, परंतु या अंदाजांवरून भारतातील लोकसंख्येचे भविष्यातील धार्मिक संतुलन कसे असेल, याची झलक निश्चितच मिळते.