लखनऊ,
IAS transfers in Uttar Pradesh उत्तर प्रदेश सरकारने प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी मंगळवारी तब्बल ४६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आणि मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरही फेरबदल करण्यात आले आहेत. राजेश कुमार यांची मिर्झापूरचे नवे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, त्यांच्या नियुक्तीमुळे मिर्झापूर विभागातील विकास प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यमान आयुक्त बालकृष्ण त्रिपाठी यांना सामान्य प्रशासन विभागात सचिव म्हणून बदली देण्यात आली आहे.
याशिवाय, कौशांबी आणि बलरामपूर जिल्ह्यांच्या डीएम पदांवरही बदल करण्यात आले आहेत. कौशांबीमध्ये सिंचन आणि कृषी विकासावर तर बलरामपूरमध्ये सीमावर्ती सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. दरम्यान, प्रखर सिंह यांची वाराणसीचे मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) म्हणून नियुक्ती झाली आहे. वाराणसीतील स्मार्ट सिटी प्रकल्प, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि गंगा पुनरुज्जीवन यांसारख्या योजनांना आता नव्या वेगाने चालना मिळेल. नियुक्ती आणि कार्मिक विभागाचे प्रधान सचिव एम. देवराज यांनी सांगितले की, ही बदल्यांची यादी राज्य सरकारच्या नियमित पुनरावलोकनाचा भाग आहे. अधिकाऱ्यांचा अनुभव, कार्यक्षमता आणि स्थानिक गरजा विचारात घेऊनच या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली झाली होती. प्रतीक्षा यादीतील अर्चना अग्रवाल यांना परिवहन विभागाची जबाबदारी तसेच उत्तर प्रदेश राज्य रस्ते वाहतूक महामंडळ (UPSRTC) चे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्यांच्यापूर्वी ही जबाबदारी अमित कुमार गुप्ता यांच्याकडे होती, ज्यांना आता परिवहन विभागातून मुक्त करण्यात आले आहे. अर्चना अग्रवाल यांनी १५ वर्षांपूर्वीही परिवहन आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्या सध्या अतिरिक्त मुख्य सचिव असून पुन्हा विभागात त्यांची पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे, अमित कुमार गुप्ता यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. कारण त्यांच्या १५ वर्षांच्या सेवेत त्यांनी तब्बल १४ वेळा बदली अनुभवली असून त्यांनी सर्वाधिक जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.