नागपूर,
International Yoga Conference जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान रामनगर येथे त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय योगसंमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष राम खांडवे गुरुजी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी भारती कुसरे, सुनील शिरशीकर, वसंत नानेकर, अतुल मजूमदार आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योगसंमेलनाचे उद्घाटन नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. योगसंमेलनाच्या इतर सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे.
खांडवे गुरुजींचे विशेष रोगोपचार वर्ग
योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष राम खांडवे गुरुजी लिखित अनुभवसिद्ध योगोपचार या ग्रंथाच्या हिंदी आवृतीचे विमोचन तसेच इंग्रजी आवृतीचे संध्याकाळी ६ वाजता केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होईल. यावेळी वैद्यकीय शिक्षणतज्ज्ञ डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची उपस्थितीत राहील. योगसंमेलनात देशभरातून ४ हजार साधकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती खांडवे गुरुजी यांनी दिली. तीन दिवसाच्या योगसंमेलनात गोविंददेव गिरी महाराज, रामकृष्ण मठाचे स्वामी राघवेंद्रनंद, मुकुल कानिटकर, अमृतवक्ता विवेक घळसासी, अष्टांगयोगाचे सिध्दहस्त अशीत आंबेकर, डॉ. योगेश वाईकर, प्रख्यात समाजसेविका विशुद्धानंदा ( भारती ठाकूर), वेदांतावरील सुप्रसिद्ध वक्ते मधुसूदन पेन्ना, डॉ. रमा गोळवलकर, आहारतज्ज्ञ रवी महाजन आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.
योगसंमेलनात एम्सचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, डॉ. सुधीर भावे, डॉ. परिमल तायडे, डॉ. अलोक उमरे, डॉ.गिरीश वेलणकर, डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. उज्ज्वला देशमुख, दाणी वखरे यांचा योगाद्वारे महिला सक्षमीकरण’ यावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. योगसंमेलनात विविध विषयांवर चर्चा होणार असून योगसाधनेची अनुभूती देणारे सकाळचे योगवर्ग आणि खांडवे गुरुजींचे विशेष रोगोपचार वर्ग या योगसंमेलनाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.