तभा वृत्तसेवा
महागाव,
Tree Cutting : या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाèयांचे दुर्लक्ष, तर काही ठिकाणी थेट आशीर्वाद व सहकार्याने, काळी (दौलत) वनपरिक्षेत्रात सर्रासपणे मौल्यवान वृक्षांची, विशेषत: सागवानाची अवैध तोड होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात आली असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.
महागाव तालुक्यातील काळी (दौ) वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनतस्कर सक्रिय झाले असून, मौल्यवान सागवान आणि इतर प्रजातींचे वृक्ष निर्दयपणे तोडून त्याची तस्करी करत आहेत. दिवसाढवळ्याही काही ठिकाणी लहान-मोठी झाडे तोडली जात असताना, वनविभागाचे कर्मचारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या अवैध वृक्षतोडीमागे वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांची तस्करांशी थेट ‘मिलीभगत’ असल्याचा संशय व्यक्त होत आहे. लाकूड तस्कर टोळ्या वन कर्मचाèयांशी संपर्क साधून त्यांना ‘हप्ता’ देतात आणि त्यानंतर बिनबोभाट वृक्षतोड करतात. वन तपासणी नाक्यांवरही ठोस तपासणी होत नाही, ज्यामुळे लाकूड भरलेले ट्रक सहजपणे बाहेर पडत आहेत.
काळी (दौ) परिक्षेत्र हे जैवविविधता आणि मौल्यवान सागवान वनसंपदेसाठी ओळखले जाते. मात्र, अशा बेकायदेशीर वृक्षतोडीमुळे हे जंगल उजाड होण्याच्या मार्गावर आहे. ही अवैध वृक्षतोड तत्काळ थांबली नाही, तर येत्या काळात या परिसरातील वनसंपदा पूर्णपणे नष्ट होईल. यामुळे वन्यजिवांचा अधिवास धोक्यात येईल आणि पर्यावरणाचा समतोल बिघडेल, अशी भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
पर्यावरणप्रेमींनी गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून या ‘मिलीभगत’मध्ये सामील असलेल्या वनविभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाèयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तस्करांना जेरबंद करून त्यांच्यावर कायद्यानुसार ठोस गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकाèयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. या प्रकरणाची उच्चस्तर चौकशी होऊन त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा ‘काळी दौलत’ वनपरिक्षेत्रातील ‘हिरवी दौलत’ केवळ आठवणीतच उरेल.