कानपूर,
Kill the family or die जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे नातेवाईक आलोक मिश्रा यांचा १६ वर्षीय मुलगा आरव मिश्रा याने स्वतःचा जीव घेतला आहे. ही धक्कादायक घटना कानपूरच्या कोहना परिसरात घडली असून, आरवने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, एक सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत आरवने लिहिले आहे की, “मला आत्मे त्रास देत आहेत; ते मला सांगतात की माझ्या कुटुंबाला मारून टाका किंवा स्वतः मरून जा.” या विधानाने पोलिसांसमोर नव्या प्रश्नांची मालिका उभी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आलोक मिश्रा आपल्या पत्नी दिव्या, मुलगी मान्या आणि मुलगा आरव यांच्यासह कोहना भागात राहत होते. आरव हा अकरावीचा विद्यार्थी होता आणि काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे त्याच्या कुटुंबाने सांगितले आहे. दिवाळीपूर्वी आरवने आपल्या बहिणीला सांगितले होते की, त्याला काही अज्ञात चेहरे दिसतात आणि ते त्याला भीतीदायक गोष्टी सांगतात. मात्र, त्यावेळी कुटुंबाने त्याचे बोलणे फारसे गांभीर्याने घेतले नव्हते.
घटनेच्या वेळी आरवचे पालक भागलपूर येथे छठपूजेसाठी गेले होते, तर त्याची बहीण कॉलेजच्या वसतिगृहात होती. घरात तो फक्त आजीसोबत होता. संध्याकाळी जेव्हा आजीने आरवच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला असता, आरव पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी तात्काळ शव ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. कोहना पोलिस ठाण्याचे प्रभारी विनय तिवारी यांनी सांगितले की, ही आत्महत्येची घटना आहे आणि चिठ्ठीत आत्म्यांनी पछाडल्याचा उल्लेख आहे. सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. दरम्यान, भाजपचे अनेक आमदार आणि स्थानिक नेते सोमवारी आलोक मिश्रा यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबीयांना सांत्वन दिले. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस आरवच्या मानसिक स्थितीचा आणि त्याच्यावर कोणत्याही बाह्य दडपणाचा परिणाम झाला होता का, याचा तपास करत आहेत.