नागपूर,
gangster golu gajbhiye शहरातील नविन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारा कुख्यात गुंड रोहित उर्फ गोलू बुध्दाजी गजभिये (वय ३६, रा. आंबेडकर नगर, डॉ. बाबासाहेब पाटीगणाजवळ) यास नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती व विघातक कृत्ये प्रतिबंधक अधिनियम १९८१ अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केला आहे.
गजभिये याच्यावर खून, गंभीर दुखापत, धमकी, मारहाण, मालमत्तेचे नुकसान, अश्लील भाषेत शिवीगाळ, शस्त्र बाळगणे आणि सार्वजनिक शांतता भंगविण्यासाठी केलेल्या गुन्ह्यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्याच्या सततच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले होते. सन २०२१ आणि २०२४ मध्ये नविन कामठी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ११०(ई)(ग) सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यावेळी घेतलेल्या बंधपत्राचे उल्लंघन करून त्याने पुन्हा गंभीर गुन्हे केले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नविन कामठी यांनी गुन्हे शाखेकडे त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. गुन्हे शाखेतील एम.पी.डी.ए. विभागाने सखोल तपास करून प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी रोहित उर्फ गोलू गजभिये यास सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका निर्माण करीत असल्याचे नमूद करून स्थानबद्धतेचा आदेश पारित केला.gangster golu gajbhiye या आदेशान्वये आरोपीला प्रथम नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले असून, त्यानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे हलविण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एम.पी.डी.ए. विभागाने केली. नागपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गुन्हेगारी कृत्यांविरुद्ध सहकार्य करून शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखावी.