आदिवासींच्या पारपंरिक कलांचे सादरीकरण

‘बिरसा कलासंगम’ची विभागीय फेरी उत्साहात

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
अमरावती, 
Presentation of traditional tribal arts पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांतील आदिवासी जमातींच्या नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला आदी कलांचा संगम ‘भगवान बिरसा कलासंगम’ या स्पर्धेच्यानिमित्ताने मंगळवारी बघायला मिळाला. आदिवासी एकता मित्र मंडळ, स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त नवसारी, अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये ‘भगवान बिरसा कलासंगम’ ही राज्यस्तरीय आदिवासी कलास्पर्धेची पश्चिम विदर्भाची विभागीय फेरी उत्साहात पार पडली. नृत्य, गायन, वाद्य वादन, चित्रकला, हस्तकला या प्रकारांत ही स्पर्धा घेण्यात आली. पश्चिम विदर्भात सुमारे विविधरंगी आदिवासी पोषाख केलेल्या ४०० स्पर्धकांनी शाळेचा परिसर रंगून गेला होता. स्पर्धेचे उद्घाटनाला सामाजिक कार्यकर्ते नंदू बिलावेकर, गौरव काकडे, लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या विश्वस्त रेखा मावस्कर, सचिव प्रशांत बोपर्डीकर यांची उपस्थिती होती.
 
 
Presentation of traditional tribal arts
 
उद्घाटनानंतर विविध स्पर्धांना प्रारंभ झाला. नृत्य स्पर्धेमध्ये गादुली सुसुन, चाचरी गोगल्या, दंडार, गाव बोधनी, गोंडी नृत्य, भिदेव नाईकड असे विविध पारंपरिक नृत्य सादर करून स्पर्धेत कलाकारांनी रंगत आणली. वादन स्पर्धेत कलाकारांनी विविध पारपंरिक वाद्याच्या वादनाचे कसब सादर केले तर पारंपरिक गीतांनी गायनकलेत रंग भरले. दुसरीकडे चित्रकला व हस्तकला स्पर्धेलादेखील उत्तम प्रतिसाद लाभला.
 
 
मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत भुजाडे यांनी केले. महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना संधी, सन्मान आणि राज्यस्तरीय ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली असून पूर्व विदर्भाकरिता ही स्पर्धा गडचिरोली येथे होईल. या दोन्ही स्पर्धांमधून निवडलेल्या स्पर्धांची अंतिम राज्यस्तरीय फेरी पुढील महिन्यात नागपुरात होणार असल्याची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्यावतीने घेण्यात येणार्‍या या अंतिम फेरीतील विजेत्यांना भरघोस पारितोषिके दिली जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाचारे यांनी केले.