धक्कादायक...युक्रेनमध्ये भटक्या कुत्र्यांचा रंग पडतो आहे निळा!

    दिनांक :28-Oct-2025
Total Views |
कीव,
Stray dogs in Ukraine are blue युक्रेनमध्ये घडलेली एक विचित्र आणि चिंताजनक घटना सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपास फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा रंग अचानक निळा झाल्याने स्थानिक नागरिकांसह वैज्ञानिक समुदायातही खळबळ उडाली आहे. ‘डॉग्स ऑफ चेर्नोबिल’ या संस्थेने या निळ्या कुत्र्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Stray dogs in Ukraine are blue
 
या व्हिडिओंमध्ये दिसणारे कुत्रे शिकारी जातीचे असून त्यांचा रंग इतका स्पष्ट निळा झाल्याचे पाहून स्थानिक लोकही थक्क झाले आहेत. एका आठवड्याच्या आतच या कुत्र्यांचा रंग बदलला असून, या मागे नेमकं कारण काय आहे हे अद्याप कोणालाही समजू शकलेले नाही. संस्थेच्या स्वयंसेवकांनी सांगितले की, आम्ही नसबंदीसाठी कुत्रे पकडत असताना आम्हाला तीन पूर्णपणे निळे कुत्रे दिसले. हा रंग कसा बदलला हे आमच्यासाठीही कोडे आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हे कुत्रे खूप चपळ असून त्यांना पकडणे कठीण जात आहे. एकदा हे कुत्रे पकडल्यावर त्यांच्या शरीरावर आणि रक्तावर चाचण्या करूनच खरी कारणमीमांसा होऊ शकते.
 
 
या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘डॉग्स ऑफ चेर्नोबिल’ने शेअर केलेले व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले असून, जगभरातील लोकांकडून या कुत्र्यांना वाचवण्याची मागणी होत आहे. काही युजर्सनी याला अणुऊर्जेच्या धोक्यांबद्दलचा इशारा असे संबोधले आहे. एका युजरने म्हटले, हे आपल्याला पुन्हा आठवण करून देत आहे की चेर्नोबिलचा किरणोत्सर्ग आजही जिवंत आहे. चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात 1986 साली झालेल्या भीषण दुर्घटनेत 40 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक गंभीर किरणोत्सर्गाने जळाले होते. या अपघातानंतर संपूर्ण शहर रिकामे करण्यात आले आणि हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मात्र, त्या वेळी अनेक पाळीव प्राणी मागेच राहिले.
 
या प्राण्यांच्या वंशजांची काळजी ‘डॉग्स ऑफ चेर्नोबिल’ संस्था गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहे. त्यांच्या मते, सध्या या परिसरात 250 हून अधिक भटके कुत्रे राहतात. या निळ्या कुत्र्यांच्या घटनेमुळे पुन्हा एकदा चेर्नोबिल परिसरातील किरणोत्सर्गाच्या परिणामांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक तज्ञांचे मत आहे की, या कुत्र्यांचा रंग बदलणे हे किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे किंवा एखाद्या रासायनिक पदार्थाच्या संपर्कामुळे झाले असावे. यामुळे त्या परिसरातील पर्यावरण, प्राणी आणि मानवांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जगभरात आता या रहस्यमय घटनेचे कारण शोधण्यासाठी वैज्ञानिक पातळीवर तपास सुरू करण्यात येणार असून, “निळ्या कुत्र्यांचा गूढ” उलगडण्यासाठी सर्वांचे डोळे युक्रेनकडे लागले आहेत.