मुंबई,
Wedding season from November विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबांचे, दोन आत्म्यांचे पवित्र मिलन. हिंदू धर्मात विवाह संस्काराला अत्यंत मोठे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. प्रत्येक जण आपला विवाह सोहळा देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने, मंगलाष्टकांच्या स्वरात आणि अक्षतांच्या वर्षावात पार पडावा, अशी इच्छा बाळगतो. त्यामुळेच कोणत्याही विवाहसोहळ्यापूर्वी पंचांग आणि शुभ मुहूर्ताचा सल्ला घेणे अत्यावश्यक मानले जाते.
यंदा पुन्हा एकदा लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होत आहे. देवऊठनी एकादशी (२ नोव्हेंबर २०२५) पासून चातुर्मास संपून शुभकार्यांना प्रारंभ होणार आहे. धार्मिक परंपरेनुसार, देवशयनी एकादशी (६ जुलै) पासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि या काळात विवाह, गृहप्रवेश किंवा इतर शुभकार्ये टाळली जातात. मात्र, तुळशी विवाहानंतर देवऊठनी एकादशीच्या दिवशी विष्णू जागृत होतात, आणि तेव्हापासून पुन्हा सर्व मंगलकार्यांना गती मिळते.
तुळशी विवाह हा चातुर्मासाचा शेवट मानला जातो. त्यामुळे २ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या तयारीला देशभरात जोर येईल. वधू-वरांच्या शोधापासून मंडप सजावटीपर्यंत, संगीत आणि मेहेंदीपासून जेवणावळीपर्यंत, सगळीकडे लगीनघाईचे वातावरण दिसेल. वैदिक पंचांगानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत विवाहासाठी काही विशेष शुभ दिवस आहेत. नोव्हेंबरमध्ये २, ३, ५, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५ आणि ३० नोव्हेंबर या तारखांना विवाहयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे या महिन्यात सर्वत्र बँडबाजे, बाराती आणि मंगलाष्टकांचा गजर ऐकू येणार आहे.
तथापि, डिसेंबर महिन्यात फक्त तीनच शुभ दिवस उपलब्ध आहेत. ४, ५ आणि ६ डिसेंबर २०२५. या तारखा अत्यंत मंगल मानल्या गेल्या असून, ग्रह-नक्षत्रांची स्थितीही त्या दिवसांत विवाहासाठी अत्यंत अनुकूल असल्याचे पंचांग सांगते. ज्योतिषांच्या मते, या कालावधीत ग्रहस्थिती शुभ असून विवाहबंधन दीर्घकाळ टिकण्यासाठी अनुकूल योग निर्माण झाला आहे. तरीही, प्रत्येकाने आपापल्या कुंडलीनुसार ज्योतिष किंवा ब्राम्हणांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. चातुर्मास संपल्याने पुन्हा एकदा मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे.