प्रदूषणाचे रौद्ररूप...भारतात वायू प्रदूषणामुळे १७ लाखांचा बळी

WHO चा धक्कादायक अहवाल

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
1.7 million deaths due to air pollution वायू प्रदूषण आता केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर मानवी अस्तित्वालाच आव्हान देणारे एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या The Lancet Countdown हवालाने या धोक्याची भीषणता उघड केली आहे. अहवालानुसार, केवळ २०२२ साली भारतात PM 2.5 सारख्या सूक्ष्म प्रदूषकांच्या संपर्कामुळे तब्बल १७ लाख १८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. हे कण इतके सूक्ष्म असतात की ते थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचून श्वसन व हृदयरोगांसारखे गंभीर आजार निर्माण करतात.
 
 

1.7 million deaths due to air pollution 
 
अहवालानुसार, गेल्या १२ वर्षांच्या तुलनेत ही संख्या प्रचंड वाढली असून, २०१० पासून मृत्यूंच्या संख्येत तब्बल ३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आकडेवारीने वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोका आणि त्याचा आरोग्यावर होत असलेला खोलवर परिणाम अधोरेखित केला आहे. भारतातील एकूण प्रदूषणात कोळसा आणि द्रवीभूत वायू (LPG) यांचा वाटा जवळपास ४४ टक्के असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
 
केवळ कोळशाच्या वापरामुळे २०२२ मध्ये सुमारे ३.९४ लाख मृत्यू झाले, यापैकी २.९८ लाख मृत्यू वीज प्रकल्पांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे झाले. तर, रस्ते वाहतुकीत पेट्रोलच्या जास्तीच्या वापरामुळे आणखी २.६९ लाख मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे.द लॅन्सेट काउंटडाउनअहवालात हवामान बदलाचे भयावह परिणामही नमूद करण्यात आले आहेत. २०२४ पर्यंत भारतात प्रत्येक व्यक्ती सरासरी २० दिवस उष्णतेच्या लाटा अनुभवेल, ज्यापैकी एक तृतीयांश दिवस हे थेट हवामान बदलाचे परिणाम असतील. तसंच, उष्णतेशी संबंधित मृत्यूंमध्येही २३ टक्क्यांनी वाढ झाल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोलकात्याचे प्रसिद्ध फुफ्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अरुप हलदर यांनी सांगितले की, २०२२ मध्ये वायू प्रदूषणामुळे होणारे मृत्यू त्या वर्षीच्या कोविड-१९ मृत्यूपेक्षा तीनपट जास्त होते. हा आकडा वायू प्रदूषणाचा धोका आणि त्याचे सामाजिक तसेच आर्थिक परिणाम किती खोलवर पोहोचले आहेत, हे स्पष्ट दाखवतो. अहवालात आर्थिक नुकसानाचाही अंदाज देण्यात आला आहे. २०२२ मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेल्या अकाली मृत्यूंमुळे भारताचे सुमारे ३३९.४ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे, जे देशाच्या एकूण GDP च्या जवळपास ९.५ टक्के इतके आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की जर सध्याच्या गतीने प्रदूषण वाढत राहिले, तर पुढील दशकात वायू प्रदूषण हे भारतासाठी कोविडपेक्षाही अधिक मोठे आरोग्य संकट ठरू शकते. सरकारने आणि जनतेने एकत्र येऊन प्रदूषणाविरुद्ध निर्णायक पावले उचलली नाहीत, तर “श्वास घेणे” हेच सर्वात मोठे आरोग्याचे आव्हान ठरेल.