ब्राझीलमध्ये ६० ड्रग्ज तस्करांचा पोलिसांकडून खात्मा!

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
रिओ दि जानेरो,
60 drug traffickers killed in Brazil ब्राझीलमधील रिओ दि जानेरो शहरात पोलिस आणि ड्रग्ज तस्करांमध्ये भीषण चकमक झाली. संघटित गुन्हेगारीविरोधी या कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला, ज्यात ६० ड्रग्ज तस्करांचा समावेश असून ४ पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत. ही कारवाई देशातील सर्वात धोकादायक ड्रग्ज टोळी ‘कोमांडो व्हर्मेल्हो’ च्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी करण्यात आली होती.
 
 
60 drug traffickers killed in Brazil
 
या मोठ्या छाप्याची योजना तब्बल एक वर्षापूर्वी तयार करण्यात आली होती. कारवाईदरम्यान २,५०० हून अधिक लष्करी आणि नागरी पोलिस दलाचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी तस्करांच्या नियंत्रणाखालील भागात प्रवेश केल्यानंतर अचानक गोळीबार सुरू झाला आणि भीषण चकमक रंगली. अधिकाऱ्यांच्या मते, ही कारवाई अद्याप सुरू असून मृतांची संख्या आणखी वाढू शकते. आतापर्यंत ८१ संशयितांना अटक करण्यात आली असून ४२ रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
 
 
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, टोळी सदस्यांनी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला. पेन्हा कॉम्प्लेक्स भागात पोलिसांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यांनंतरही सुरक्षा दलांनी खंबीरपणे प्रत्युत्तर दिले आणि गुन्हेगारांना मागे हटवले. रिओ दि जानेरोचे गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा आता केवळ गुन्हा राहिलेला नाही; तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेला संघटित कट आहे, ज्यामागे डाव्या विचारसरणीची टोळी कार्यरत आहे. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकार आणि पोलिस दल या गुन्हेगारीविरोधी लढ्यात पूर्ण ताकदीने उभे आहेत.