ठाणे,
65-year-old woman gang-rap भिवंडी तालुक्यातील एका गावात मंगळवारी दुपारी उघडकीस आलेल्या धक्कादायक घटनेत ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. घटना घडल्याच्या ताबडतोब स्थानिक गणेशपुरी पोलिसांसह ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनव मित्तल आणि उपविभागीय अधिकारी राहुल झालटे घटनास्थळी दाखल झाले.
मृत वयोवृद्ध महिला मंगळवारी आपल्या शेतात गेली होती. शेतात असताना तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, ही माहिती कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी ताबडतोब शेताकडे धाव घेतली. तेव्हा महिला निपचित पडलेली होती. कुटुंबीयांनी ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात नेण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी सांगितले की, "या प्रकरणात अत्याचारासह खुनाचा गुन्हा दाखल केला असून एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाद्वारे सध्या तपास सुरू आहे."घटनेनंतर तीन आरोपी पळून गेले असल्याचे पाहुण्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या गळ्यामध्ये असलेले पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीलेले नाहीत. त्यामुळे ही घटना केवळ संपत्तीसाठी नव्हे, तर अत्याचार व बदला घेण्याच्या हेतूने घडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
समाजात या घटनेवर मोठा संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि वकील संघटनांचे अध्यक्ष अॅड किरण चन्ने यांनी म्हटले की, "वयोवृद्ध महिलेवर झालेला अत्याचार आणि हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. आरोपींवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. महिलांची आणि मुलींची सुरक्षा ही समाजाची प्राथमिक जबाबदारी आहे."घटना स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करते. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवत, महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाने घटनेच्या सर्व पैलूंचा त्वरित आणि पारदर्शक तपास करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.