नागपूर,
bachchu-kadus-and-collector नागपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने बुधवारी नाट्यमय वळण घेतले, जेव्हा शेतकरी नेते आणि प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत त्यांना मीडियासमोर चांगलेच झापले. या भेटीत बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटलं, आम्ही इतके दिवस इथे आंदोलन करत बसलो, पण तुम्हाला आम्हाला भेटायची गरज वाटली नाही का? आज अचानक वेळ कसा मिळाला?” जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की ते आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात होते, यावर कडू संतापाने म्हणाले, कुठल्या संपर्कात होतात तुम्ही? आम्हाला मूर्ख समजता का? कायदा-सुव्यवस्था राखणे ही तुमची जबाबदारी आहे, ती तुम्ही पार पाडली का?

पुढे बोलताना बच्चू कडू यांनी अधिक कठोर शब्द वापरत जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं, “आंदोलनादरम्यान तुमचा एकही फोन आला नाही. तुमचा एसपी भाजपचा झेंडा घेऊन फिरतोय, आणि तुम्ही मात्र मौन बाळगून बसलात. तुम्हाला प्रशासनाचं काम करायचं नसेल तर थेट भाजपच्या कार्यालयातून काम करा! या संपूर्ण घटनेदरम्यान ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी, मीडिया प्रतिनिधी आणि प्रमुख शेतकरी नेते उपस्थित होते.
कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी गेल्या काही दिवसांपासून नागपुरात आंदोलन करत आहेत. आज सायंकाळी न्यायालयाने बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळ रिकामं करण्याचा आदेश दिल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह स्वेच्छेने अटक देण्यासाठी निघाले होते. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी स्वतः आंदोलनस्थळी पोहोचले आणि बच्चू कडू यांची भेट घेतली. नागपूरच्या या तुफानी आंदोलनाने राज्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ माजवली आहे.