बच्चू कडूंचा महाएल्गार...अटक नाही केली तर रेल रोको!

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Bachchu Kadu's Maha Elgar शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर-हैदराबाद महामार्गावर त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. न्यायालयाने आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट पोलीसांकडे अटक करून घेण्यासाठी मोर्चा वळवला. बच्चू कडू यांनी पोलीसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट लिहिले आहे की, आम्हाला एका तासाच्या आत अटक करा. जर अटक केली नाही, तर आम्ही पुन्हा आंदोलनस्थळी परत येऊ आणि प्रश्न सुटला नाही तर उद्यापासून रेल रोको आंदोलन सुरू करू.

Bachchu Kadu 
 
त्यांच्या या इशाऱ्यामुळे प्रशासन आणि सरकार दोन्ही गोंधळले आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती रेल्वे केंद्रांपैकी एक असल्याने, रेल रोको झाल्यास देशभरातील रेल्वे वाहतूक कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. मंत्री पंकज भोयर आणि मंत्री आशिष जैसवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी निघाले आहे. हे शिष्टमंडळ दुपारी चार वाजता येणार होते, मात्र काही कारणांमुळे उशीर झाला असून, ते लवकरच आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत. चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
बच्चू कडू यांनी कोर्टाच्या आदेशानंतर आपला संताप व्यक्त करत म्हटले, काही लोकांना वाटते आंदोलन संपले, पण खरं तर आंदोलन आता सुरू होत आहे. निवडणुकीत मशीन वापरतात, आंदोलन दाबण्यासाठी न्यायालय वापरतात, एखाद्याला पक्षात आणण्यासाठी ईडी लावतात. आता लोक न्यायालयावरच आंदोलन करतील. तुम्ही तुमची ताकद दाखवा, आम्ही आमची ताकद दाखवू. त्यांच्या या घोषणेमुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन सतर्क आहे, तर समर्थक बच्चू कडूंच्या पाठीशी उभे राहून शेतकऱ्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही अशी गर्जना करत आहेत.