बच्चू कडूंचे आंदोलन पेटले! आंदोलक थेट रेल्वे रुळावर उतरले

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Bachchu Kadu's protesters अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले आंदोलन आज उग्र रुप धारण केले असून, संतप्त आंदोलनकर्ते थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. या रेल्वेरोको आंदोलनामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वीच प्रशासनाला इशारा दिला होता की, आमच्या मागण्या न मानल्यास आम्ही रेल्वेरोको आंदोलन करणार. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आज सकाळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते रुळावर उतरले. घोषणाबाजी, बॅनर आणि फलक घेऊन आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.
 
 
Bachchu Kadu
या अचानक झालेल्या रेल्वेरोकोमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांनी काही ठिकाणी आंदोलकांना रुळांवरून हटवण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलनकर्ते आपला निर्धार सोडायला तयार नाहीत. बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांवर उत्तर न मिळाल्यास असं आंदोलन पुन्हा होईल. आम्ही लोकांसाठी लढतो आणि शेवटपर्यंत लढत राहू. संपूर्ण घटनेमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, बच्चू कडूंच्या या थेट कृतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.