नागपूर,
banned-tobacco-seized नागपूर शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे २.१६ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मादक व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात विशेष मोहिम सुरू आहे.

याच मोहिमेअंतर्गत गणेशपेठ पोलिसांचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की हंस ट्रॅव्हल्स ऑफिस, जाधव चौक, गणेशपेठ येथे प्रतिबंधित तंबाखूचा साठा ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह त्या ठिकाणी पंचनामा करून छापा टाकला असता, तेथे आशिष तानाजी पालकर (वय ३३, रा. रतन कॉम्प्लेक्स, गणेशपेठ) हा व्यक्ती तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवताना आढळला. त्याच्या ताब्यातून विविध कंपनींच्या आणि फ्लेवर्सच्या सुगंधित तंबाखूच्या पाऊचसह एकूण २ लाख १६ हजार ९६८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने सांगितले की, हा माल तो ‘आशिष’ आणि ‘सुरज’ नावाच्या अन्य व्यक्तींसाठी विक्रीसाठी ठेवला होता. आरोपी आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमर यादव सोनटक्के यांच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलीस ठाण्यात कलम १२३, २२३, २७४, २७५ भा.न्या.सं. सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. banned-tobacco-seized ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल, सहायक पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संजय मेंढे, पोउपनि मल्हारी डोईफोडे आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे शहरात तंबाखू विक्रेत्यांमध्ये एक प्रकारची धडकी भरली आहे.