करपा, मावा, तुडतुड्याचा धानावर प्रकोप

उत्पन्नात घट होण्याची चिंता

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
bhandara-news : जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये खरीप हंगामातील धानपीक गर्भात आले असून काही शेतक-यांचे धान नुकतेच कापणीला आले आहेत. मात्र ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव दिसून येत असून करपा, मावा, तुडतुडा यांसारख्या अनेक रोगाने घेरले आहे. नैसर्गिक आपत्ती धानाचे उत्पादन कमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. आलेल्या रोगावर सतत उपायोजना करूनही कीड व रोग नियंत्रणात न आल्यामुळे शेतकरी हताश व चिंतेत आहेत.
 
 
 
K
 
 
 
सप्टेंबर महिन्यात संततधार पावसाने जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच परिसरात धानपिकांचे अतोनात नुकसान केले. हलक्या स्वरूपाचे धान पूर्णतः पाण्यात भिजले, तर भारी वाणीचे धान जमीनदोस्त झाले. या संकटातून सावरासावर करत असतानाच, आता सर्वत्र धानपिकांवर रोगराईचे सावट पसरले आहे. धानपिकाच्या लोंबीवर हल्ला करणा-या किटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता धानपीक काटण्याच्या अवस्थेत आले आहे. अशात तुडतुडा, करपा, मावा यांसारख्या रोग पिकांवर लागल्याने कापणीला आलेले धानपीक खराब होत आहेत आणि याचा फरक फसलेवर पडणार आहे. शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक फवारण्या करीत आहे, परंतु कित्येक फवारण्या करूनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अगोदर पावसाने रडवल, त्यात वन्यप्राण्यांनी धान पिकाची नासाडी केली. आता किडींचा प्रादुभार्वाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.