तभा वृत्तसेवा
साकोली,
bhandara-news : साकोली ते आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला घनदाट झाडी-झुडपे वाढल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने या वृक्षांची कापणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
साकोली ते सानगडी राष्ट्रीय महामार्गावर माकोडे पेट्रोलपंप, पंजाबराव कृषी विज्ञान केंद्र, सुकळी फाटा, मत्स्य निर्मिती केंद्र, शिवणीबांध जलाशय मार्गावर वळणे आहेत. या वळणाजवळील घनदाट झूडपी वनस्पतींमुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसणे कठीण होते. परिणामी अनेक अपघात घडत असून जीवितहानीही झाली आहे.
साकोली ते सानगडी या मार्गावर नेहमी वर्दळ असते. हा मार्ग नवेगावबांध, अर्जुनी/मोरगाव, गडचिरोली आणि चंद्रपूरकडे जातो. परिणामी या महामार्गावरून वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सदर महामार्गावरील वृक्षांची कापणी करावी व रस्ता मोकळा करावा, या मागणीचे निवेदन बांधकाम विभागाचे उपअभियंता भंडारा यांना देण्यात आले आहे.