बुलडाणा, मोताळा एमआयडीसीची ५०० एक्कर ने होणार हददवाढ

-बुलडाणा, मोताळयात औद्योगिक धंद्याला मिळणार चालना -आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला मिळाले यश

    दिनांक :29-Oct-2025
Total Views |
प्रतिनिधी | बुलडाणा,
Sanjay Gaikwad : बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा व बुलडाणा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक घडामोड झाली आहे. बुलडाणा व मोताळा एमआयडीसीच्या विस्तारासाठी ५०० एकर अतिरिक्त जमिनीच्या हद्दवाढीस तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे बुलडाणा आणि मोताळा तालुक्यांतील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
 
 
JLK
 
सदर निर्णय २९ ऑक्टोबर रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीला आमदार संजय गायकवाड सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मोताळा आणि बुलडाणा तालुक्यात एकूण ५०० एकरांनी एमआयडीसीची हद्द वाढवण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तसेच स्थानिक स्तरावर औद्योगिक वातावरण निर्माण होईल. बुलडाणा व मोताळा एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षांपासून उपलब्ध जागेअभावी नव्या उद्योगांना अडथळे येत होते. औद्योगिक सुविधा असूनही जागेच्या मर्यादेमुळे गुंतवणूकदार मागे हटत होते. ही बाब ओळखून आमदार गायकवाड यांनी सातत्याने उद्योग विभाग व सरकारकडे पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून हद्दवाढीस मान्यता देण्यात आली आहे.
 
 
या विस्तारामुळे लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना नवे संधीक्षेत्र उपलब्ध होईल. शेतकरी व तरुण उद्योजकांना स्थानिक पातळीवरच व्यवसाय व रोजगार निर्माण करता येईल. औद्योगिक विकासासोबतच परिसरातील रस्ते, वीज, पाणी व इतर पायाभूत सुविधा सुधारणार आहेत.
 
 
आ. संजय गायकवाड यांनी सांगितले की, “मोताळा आणि बुलडाणा तालुक्यांचा औद्योगिक चेहरा बदलण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. आज मिळालेली मान्यता ही जिल्ह्याच्या विकासासाठी नवी पहाट ठरणार आहे.” औद्योगिक विभागाकडून लवकरच जमिनीचे मोजमाप, आराखडा आणि सुविधांच्या उभारणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना भूखंड उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.
 
 
या निर्णयामुळे बुलडाणा जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेग घेणार असून, मोताळा परिसर विदर्भातील एक प्रगत औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे.