नागपूर,
dance-program-at-ncp-office नागपूरमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमातील एका नृत्यप्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. स्नेहसंमेलनाचा आनंददायी वातावरण क्षणातच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या भोवऱ्यात सापडला.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस व आमदार शिवाजीराव गार्जे यांनी नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे नमूद केले आहे. मात्र, या प्रकरणात स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी माध्यमांवर गैरप्रचाराचा आरोप केला आहे. एनसीपी नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता येर्णे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की, “हा एक कौटुंबिक दिवाळी मिलन कार्यक्रम होता. आमच्या महिला कार्यकर्त्यांपैकी एक व्यावसायिक लावणी नर्तिका आहे. तिच्या सादरीकरणाचा उद्देश केवळ कला प्रदर्शन होता.” त्यांनी आरोप केला की काही माध्यमांनी “एनसीपी ऑफिसमध्ये लावणी नृत्य” आणि “मला जाऊ द्या ना घरी” अशा भडक मथळ्याखाली हा व्हिडिओ प्रसारित केला, ज्यामुळे कार्यक्रमाचा हेतूच बदलून गेला. “त्या महिलेचा सन्मान बाजूला ठेवून व्हिडिओ विकृत पद्धतीने सादर करण्यात आला. dance-program-at-ncp-office निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची प्रतिमा खराब करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न वाटतो,” असे येर्णे म्हणाल्या. या घटनेनंतर पक्षाच्या वरिष्ठांनी संयम आणि शिस्त राखण्याचे आवाहन केले असून, स्थानिक पदाधिकारी हे प्रकरण केवळ मीडियातील गैरसमज असल्याचे म्हणत आहेत. एक साधा दिवाळी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आणि त्यातून उभा राहिलेला राजकीय गदारोळ यामुळे नागपूरच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.