नवी दिल्ली,
Gold fell by 12,000 in 12 days सणांचा हंगाम ओसरताच मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत प्रचंड घट झाली असून, गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. जागतिक बाजारपेठेतील दबाव, डॉलरची मजबुती आणि नफा वसुली यामुळे या दोन्ही धातूंच्या भावात मोठा उतार आला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याने प्रति १० ग्रॅम १,३०,८७४ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. परंतु फक्त १२ दिवसांतच ते ११८,०४३ रुपयांवर आले आहे, म्हणजेच तब्बल १२,८३१ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्याच कालावधीत चांदीचा भाव प्रति किलोग्रॅम १,७८,१०० रुपयांवरून घसरून १,४१,८९६ रुपयांवर आला असून, जवळपास ३६,२०४ रुपयांची घट झाली आहे.

मंगळवारी बाजारातही अस्थिरता कायम राहिली. दुपारी सोने ₹१,१९,१६४ प्रति १० ग्रॅम दराने व्यवहारात होते, तर संध्याकाळपर्यंत ते ₹१,१८,०४३ रुपयांवर आले — केवळ काही तासांतच ₹१,१२१ ची घसरण. सोमवारच्या तुलनेत सोन्याचा दर एकूण ₹३,०३४ रुपयांनी कमी झाला. चांदीतही दिवसभरात ₹१,५०४ रुपयांची घसरण होऊन ती ₹१,४१,८९६ रुपयांवर बंद झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे भाव कमकुवत झाले. डिसेंबर २०२५ च्या करारात १.२६% घसरण नोंदवली गेली आणि दर ₹१,१९,४२९ प्रति १० ग्रॅम इतका ठरला. व्यापारादरम्यान सोने ₹१,१७,६२८ च्या नीचांकी आणि ₹१,२०,१०६ च्या उच्चांकावर पोहोचले. दिवसअखेर चांदीत थोडी सुधारणा झाली असून ती ०.२७% वाढून ₹१,४३,७५० प्रति किलो झाली.
जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि नफा वसुलीच्या प्रवृत्तीमुळे दबाव निर्माण झाला आहे. त्यांचा अंदाज आहे की सोने अल्पावधीत ₹१.१५ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत घसरू शकते, मात्र दीर्घकाळात पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदार ‘वेट अँड वॉच’ धोरणावर आहेत, तर बाजारात नवीन खरेदीची गती मंदावली आहे. तज्ञांचा सल्ला असा की, अल्पकालीन अस्थिरतेकडे दुर्लक्ष करून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही वेळ संधी म्हणून पाहिली जाऊ शकते.