मुंबई,
Devendra Fadnavis : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे मोठे मदतपॅकेज जाहीर केले आहे. यापैकी ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य आधीच वितरित करण्यात आले असून, आणखी ११ हजार कोटी रुपये येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. मदतीसाठी निधीची कोणतीही कमतरता नाही. पुढील १५ दिवसांत किमान ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी सांगितले की, काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक त्रुटी असून काहींच्या नोंदी अद्ययावत नाहीत. अशा प्रकरणांवर जलदगतीने कार्यवाही केली जात आहे. पात्र शेतकरी मदतपासून वंचित राहू नयेत आणि अपात्रांना निधी मिळू नये म्हणून ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडे अॅग्रीस्टॅकचा डेटा उपलब्ध असल्याने ज्या शेतकऱ्यांची माहिती त्यात आहे, त्यांना पुन्हा ई-केवायसीची गरज नाही. अशा शेतकऱ्यांना सहाय्य निधी थेट त्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करताना फडणवीस म्हणाले की, “शासनाने सुरू केलेल्या नोंदणी प्रक्रियेमुळे व्यवहार पारदर्शक झाले आहेत. व्यापाऱ्यांकडून अन्याय्य दराने खरेदी होऊ नये म्हणून शासकीय दरावर किंवा नोंदणीकृत व्यापार्यांमार्फतच विक्री करावी.”
या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर ही आर्थिक मदत त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरणार आहे.